संजय पुजलवार यांची पोलिस उप अधीक्षक पदावर बदली

जितेंद्र कोठारी, वणी : येथील उप विभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार यांची यवतमाळ मुख्यालयात बदली झाली. त्यांच्या जागी सातारा (ग्रामीण) येथून गणेश किंद्रे यांना उप विभागीय पोलिस अधिकारी म्हणून पाठविण्यात आले आहे. राज्य शासन गृह विभागाने 22 मे रोजी पोलिस उप अधीक्षक व सहा. पोलिस आयुक्त (निःशस्त्र) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली बाबत आदेश निर्गमित केले होते. येत्या एक दोन दिवसात नवीन एसडीपीओ आपले पदभार स्वीकारणार आहेत.

वणी उपविभागात वणी, मारेगाव, शिरपूर, मुकुटबन व पाटण असे 5 पोलिस स्टेशन आहे. यात वणी व मुकुटबन पो. स्टे. पोलिस निरीक्षक संवर्गाचे तर मारेगाव, शिरपूर व पाटण ठाणे सहा.पोलिस. निरीक्षक दर्जाचे अधिकारी ठाणेदार आहे. संजय पुजलवार हे मागील 32 महिन्यापासून वणी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर होते. शासनाने पोलिस उप अधीक्षक म्हणून त्यांची बदली यवतमाळ मुख्यालयात केली आहे.

तालुक्यातील राजूर येथील एका कामगाराची संशयास्पद मृत्यू प्रकरणी हत्या झाल्याचा उलगडा एसडीपीओ संजय पुजलवार यांनी केला होता. तसेच एका चिमुकलीवर बलात्कार प्रकरणी सखोल चौकशी करून न्यायालयात आरोपीला शिक्षेस पात्र ठरविले. मात्र त्यांच्या कार्यकाळात झालेल्या 45 लाखाच्या दरोड्यातील 6 आरोपींना पकडुन मुद्देमाल हस्तगत करण्यात एसडीपीओ पथक सपशेल फेल ठरले. जिनिंग व्यवस्थापकाकडून भरदिवसा 45 लाख रुपये लुटणारे राजस्थान येथील दरोेडेखोर घटनेच्या 2 वर्षानंतरही  मोकाट आहे. 

Comments are closed.