कार्यालयीन वेळेत शहरातील अंगणवाड्यांना कुलूप

विवेक तोटेवार, वणी: शासनाने ठरवून दिलेल्या कार्यालयीन वेळेत शहरातील अनेक अंगणवाड्या बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. याबाबत कुणीही वरिष्ठांकडे तक्रार देत नसल्याने हे प्रकार सातत्याने सुरु असल्याचे आढळून येते. अंगणवाडी बंद असल्याने 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील चिमुकल्यांना सरकारकडून मिळणारा आहार याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

वणी शहरात जवळपास 20 अंगणवाडी केंद्रं आहेत. ज्यामध्ये 20 अंगणवाडी सेविका व 17 मदतनीस कार्यरत आहे. या 20 अंगणवाडी मध्ये सुमारे 1500 ते 1800 लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांमध्ये गरोदर माता, स्तनदा माता व 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालके आहेत. यातील गरोदर माता व स्तनदा माता यांना सरकारकडून घरपोच आहार दिला जातो.

6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना गहू, चना, मुगडाळ, तिखट, मीठ, हळद, साखर दोन महिन्याला वाटप केले जाते. हा आहार बालविकास विभागाद्वारे प्रत्येक अंगणवाडीला त्यांच्या लाभार्थी संख्येनुसार पुरविला जातो. तसेच 3 ते 6 वयोगटातील लाभार्थ्यांना ताजे आणि गरम आहार देण्याची जबाबदारी बचत गटावर आहे. मात्र अंगणवाडी अनेक दिवसांपासून बंद स्थितीत असल्याने हा आहार कधी पुरवला जातो? याची चौकशी होणे गरजेचे आहे.

प्रत्येक अंगणवाडी ही सकाळी 7 ते दु. 11 उघडावे असा नियम आहे. अंगणवाडी ही वर्षातून फक्त 65 दिवस बंद असते. यामध्ये रविवार व काही सण उत्सवाच्या सुट्ट्या आहे. इतर दिवस अंगणवाडी ही ठराविक वेळेत सुरू असणे गरजेचे आहे. मात्र ‘वणी बहुगुणी’ने शहरातील अंगणवाड्याबाबत माहिती काढली असता शहरातील अनेक अंगणवाड्या हा बंदच दिसून आल्या.

यामध्ये विठ्ठलवाडी, सेवानगर, गोकुलनगर, महात्मा फुले चौक, महाराष्ट्र बँक चौक येथील अंगणवाडी बंद होत्या. महाराष्ट्र बँक चौकातील अंगणवाडी सेविका ही सुट्टीवर असल्याने तेथे कार्यरत मदनिस ही अंगणवाडी उघडतच नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

अंगणवाड्यांची तपासणी करणार – अधिकारी
अंगणवाड्यांमध्ये लाभार्थ्यांना आहार वाटप सुरू आहे. अंगणवाडी या सुट्ट्यांचे दिवस व रविवार वगळून स. 7 ते दु. 11 पर्यंत चालू असणे गरजेचे आहे. उन्हाळी सुट्या असल्याने मुलांना शिकवीने बंद असले तरी अंगणवाडी वेळेत उघड्या राहणे गरजेचे आहे. जर काही अंगणवाडया बंद असल्यास सुपरवायझरद्वारा याची तपासणी करण्यात येईल.
– उपमुख्यकार्यकारी अधिकारी, महिला बालविकास प्रकल्प. यवतमाळ

1- टिनाच्या पत्र्याच्या शेडमध्ये अंगणवाडी 2- बंद असलेली अंगणवाडी

अंगणवाडीची दूरवस्था
अंगणवाडीत पुरेशा सोयीसुविधांचा अभाव आहे. एक अंगणवाडी तर टिनाच्या दुकानात आहे. यामध्ये बैठकीचीही व्यवस्था नाही. याबाबत परिसरातील लोकांना विचारणा केली असता अंगणवाडी ही उन्हाळ्याची सुट्टी असल्याने उघडी नसल्याची माहिती दिली. तर काहींच्या मते फक्त आहार वाटपाच्या दिवशीच अंगणवाडी सूरु असल्याचे सांगितले. सरकारी नियमाला केराची टोपली दाखवणाऱ्या या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.