वणी जिल्हा निर्मितीसाठी भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी जिल्हा व्हावा या मागणीसाठी पुन्हा एकदा वणीकर एकवटले आहेत. वणी जिल्ह्याच्या मागणीसाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली असून वणी जिल्हा व्हावा यासाठी नुकतेच महसूल मंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

इंग्रजांच्या काळात वणी हा जिल्हा होता. मात्र वणीचे वातावरण उष्ण असल्याने इंग्रजांनी जिल्ह्याचे मुख्यालय यवतमाळ येथे हलवले. स्वातंत्र्यानंतर अनेकदा वणी जिल्हा व्हावा या मागणीसाठी शहरात अनेक आंदोलनं झाले. नुकतेच वरोरा जिल्हा करून त्यात वणीचा समावेश करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वणीकरांमध्ये अन्याय झाल्याची भावना जागृत होऊन याविरोधात वणीतील विविध पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य लोक एकत्र येत कृती समिती स्थापन केली आहे.

वणी जिल्हा होता तो झालाच पाहिजे, या मागणीसाठी वणी जिल्हा निर्माण संघर्ष समितीने महसूल मंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले आहे. भविष्यात वणी जिह्यासाठी आणखी तीव्र लढा उभारू इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना जिया अहमद, ऍड.दिलीप परचाके, ऍड. अमोल टोंगे, ऍड. अमान शेख, ऍड. संतोष ढवळे. ऍड.शुभम उपाध्ये, ऍड. हरीश तेलतूंबडे, विवेक झाडे, शेख मोहसीन खा पठाण आदी उपस्थित होते.

यवतमाळ जिल्ह्यात वणी हा तालुका असून यवतमाळ ते वणीचे अंतर 109 किलोमीटर आहे. वणी तालुक्यातील शेवटचे गाव वणी पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव अमरावती पासून 250 किलोमीटर आहे. तर यवतमाळ जिल्ह्याचे ठिकाण 150 किलोमीटर आहे. कोणत्याही शासकीय कामाकरिता वणी तालुक्यातील जनतेला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याकरिता आणि विभागाच्या ठिकाणी जाण्याकरिता फार मोठे अंतर कापून जावे लागते. त्याचा नागरिकांना फार मोठा मानसिक व आर्थिक त्रास होत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

वणी जिल्हा निर्मितीसाठी वणी, मारेगाव, झरी जामणी हे यवतमाळ जिल्ह्यातील तालुके तसेच वणी तालुक्यातील शिरपूर व राळेगाव तालुक्यातील खैरी वडकी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा व कोरपना या तालुक्याचा समावेश करून जिल्हा निर्मिती करावी अशी मागणी कऱण्यात आली आहे. तसेच वणी जिल्ह्याची निर्मिती करून वणी जिल्हा हा नागपूर विभागात समाविष्ट करावा अशी ही मागणी निवेदनातुन मागणी केली आहे.

सन 1905 पूर्वी वणी हा जिल्हा होता तर कायर हे तालुक्याचे ठिकाण होते. वणी शहराला जिल्ह्याची पार्श्वभूमी लाभलेली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय वणी येथे होते. असे असताना वणी येथील जिल्ह्याचे मुख्यालय यवतमाळ येथे हलवून यवतमाळ हा नव्याने जिल्हा निर्माण केला होता. सध्या वणीला केवळ तहसील कार्यालय ठेवण्यात आले आहे. वणी जिल्ह्याच्या निर्मितीसाठी दिवंगत सामाजिक कार्यकर्ते हरीश मांढरे यांनी अनेक वर्ष लढा दिला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.