निष्काळजीपणा : लाठी येथील महावितरणच्या ‘त्या’ लाईनमेन विरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : शेतात जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत तारांचे स्पर्श होऊन पियूष माहूरे हा बालक गंभीर जखमी झाला होता. सदर प्रकरणी जखमी मुलाच्या काकाने केलेल्या तक्रारीवरून लाठी येथील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ (लाईनमेन) विरुद्ध शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोंडू उर्फ राजू बापूराव पावडे असं गुन्हा दाखल झालेल्या लाईनमेनचे नाव आहे. लाइनमेनच्या हलगर्जीपणामुळे बालकाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील लाठी गावातील पियूष संभाशिव माहुरे (09) हा दिनांक 2 जून 2023 रोजी दुपारी 2 वाजता आपल्या मित्रांसह गावालगत असलेल्या सुरेश माहुरे यांच्या शेतात क्रिकेट खेळण्याकरिता गेला होता. दुपारी 3 वाजता दरम्यान काही मुलं धावत गावात आले आणि पियूष माहुरेला करंट लागून शेतात पडून असल्याची माहिती नंदकिशोर सुरेश माहूरे याला दिली. नंदकिशोर यांनी गावातील काही लोकांना सोबत घेऊन लगेच शेतात पोहचला असता बालक पियूष हा जमिनीवर पडून होता. तसेच त्याच्या डाव्या तळहाताला व पायाला भाजल्याच्या जखमा पडल्या होत्या.

गंभीर जखमी पियूषचे काका गणेश हरिश्चंद्र माहुरे यांनी त्याला तात्काळ वणी ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर सुगम हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल केला. उपचारादरम्यान बालकाच्या पायाच्या गंभीर भाजलेले दोन बोटे डॉक्टरांनी कापले. सद्य त्या बालकावर लातूर येथील डॉ. लहाने यांचे दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

शेतमालक सुरेश माहुरे यांनी शेतात 11 KV विद्युत तार जमिनीवर पडून असल्याबाबत गावातील लाईनमेन धोंडू उर्फ राजू बापूराव पावडे याला 1 जून रोजी कळविले होते. एकाद्या व्यक्तीस विद्युत करंट लागून दुखापत होईल अशी भितीसुद्धा लाईनमेन जवळ व्यक्त केली होती. मात्र लाईनमेन पावडे यांनी निष्काळजीपणा दाखवून विद्युत पुरवठा बंद केला नाही किंवा जमिनीवर पडलेले विद्युत तार दुरुस्त केले नाही.त्यामुळेच बालक पियूष माहुरे याला विद्युत शॉक लागून हातापायाला गंभीर इजा झाली. असा आरोप फिर्यादी गणेश हरिश्चंद्र माहूरे, रा. लाठी यांनी केला आहे.

फिर्यादीची तक्रार तसेच विद्युत निरीक्षक यवतमाळ अ. प्र. देशमुख यांनी लाईनमेन पावडे यांनी निष्काळजीपणा केल्याबाबतचा पोलिसांना पाठविलेल्या अहवालावरून शिरपूर पोलिसांनी महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ धोंडू उर्फ राजू बापूराव पावडे (55) रा. वणी, जि.यवतमाळ विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 338 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.