अपघात झालेल्या कारची नुकसान भरपाई देण्यास नकार, पितापुत्रावर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी :  देवी दर्शनासाठी मित्राकडून मागून घेतलेली कार अपघातात क्षतिग्रस्त करून नुकसान भरपाई देण्यास नकार देणाऱ्या वणी येथील पिता पुत्रावर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित प्रकाश तोडकर व प्रकाश रामराव तोडकर रा. भोईपूरा वणी असे गैर अर्जदाराचे नाव आहे. तक्रारदार अभिजीत रामभाऊ दरेकर तर्फे महिला पोलिस कर्मचारी सुषमा बदखल यांनी वणी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

प्राप्त माहितीनुसार फिर्यादी अभिजीत रामभाऊ दरेकर (47) रा. आनंदनगर वणी यांच्या मालकीची आर्टिगा ही कार (MH29 AD 1615) असून सदर वाहन भाड्याने चालवून ते उपजीविका करतात. अभिजीत दरेकर यांची अभिजीत तोडकरशी ओळख आहे. दिनांक 30 सप्टे. 2022 रोजी यवतमाळ येथे नवरात्र उत्सव पाहायला जातो म्हणून दोन दिवसांसाठी दरेकर यांची कार तोडकर घेऊन गेला होता. मात्र निष्काळजीपणे कार चालवल्याने पांढरकवडा जवळ कारचा अपघात झाला.

अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. क्षतिग्रस्त कार नागपूर येथे दुरुस्तीसाठी नेली असता शोरुम मध्ये कार दुरुस्तीचे 1 लाख 70 हजाराचे बिल झाले. झालेल्या नुकसानाची भरपाई मी देईल असे अभिजीत तोडकर यांनी कबूल केले. मात्र वारंवार पैसे मागून ही तो भरपाई देण्यास टाळाटाळ करायला लागला. त्यामुळे फिर्यादी यांनी अभिजीत तोडकर यांच्या वडिलांना भेटून हकीकत सांगितली.

अभिजीतचे वडील प्रकाश तोडकर यांनी फिर्यादिला बँक ऑफ महाराष्ट्र वणी शाखेचे 1 लाख 70 हजाराचा धनादेश (चेक) दिला. मात्र चेक बँकेत टाकण्यापूर्वी मला कल्पना द्या अशी अट त्यांनी टाकली. दिनांक 1 मार्च 2023 रोजी फिर्यादी अभिजीत दरेकर हा गैरअर्जदार तोडकर यांचे घरी चेक टाकायचे की नाही असे विचारायला गेला असता, तोडकर यांनी चेक हिसकावून घेतला. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

घडलेल्या घटना व फसवणूक बाबत फिर्यादी अभिजीत दरेकर तक्रार द्यायला वणी पोलिस स्टेशन मध्ये गेला असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. तेव्हा फिर्यादी यांनी दिनांक 4 मे 2023 रोजी प्रथम श्रेणी न्यायालय वणी येथे पोलिसांना फसवणुकीचा गुन्हा दाखला करण्याचा आदेश देण्याबाबत अर्ज दाखल केला.

फिर्यादी यांनी सादर केलेले पुरावे व कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाने दि. 12 मे 2023 रोजी वणी पोलिसांना आरोपी अभिजीत प्रकाश तोडकर (27) व प्रकाश रामराव तोडकर (70) रा. बोढाले यांच्या चक्की जवळ, भोईपुरा, वणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशावरून वणी पोलिसांनी दि. 14 जून 2023 रोजी आरोपी पिता पुत्रवर कलम 34, 406, 420 भादवी अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.