महाऑनलाईनचे सर्वर डाऊन, विद्यार्थी व पालकांना मनस्ताप
पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या दोन तीन दिवसांपासून महाऑनलाई सर्वर डाऊन येत असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले तात्काळ मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय सर्वर डाऊन ही सेतू चालक व अधिका-यांसाठीही डोकेदुखी ठरत आहे.
निकाल लागले की शैक्षणिक दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू होते. दहावी व बारावीचा निकाल लागल्याने सध्या विद्यार्थ्यांच्या डोमेसाईल, उत्पन्न ईडब्लूएस, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर इत्यादी दाखले काढण्यास वेग आला आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून सर्वर डाऊन येत असल्याने विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास विलंब होत आहे. परिणामी शैक्षणिक नुकसान होण्याची भीती विद्यार्थी व पालकांमध्ये निर्माण झाली आहे.
दरवर्षी सर्वर डाऊनची समस्या
सध्या सर्व प्रकारचे दाखले हे शासनाच्या महाऑनलाईन या पोर्टलद्वारा काढले जाते. 10 वी 12 वीचा निकाल लागला की एकाच वेळी सेतू केंद्र, महा ईसेवा, महासेवा या माध्यमातून अर्ज केला जातो. एकाच वेळी राज्यभरातून दाखल्यांची मागणी झाल्याने महाऑनलाईन पोर्टलच्या सर्वरवर याचा लोड येतो. त्यामुळे सर्वर डाऊन होऊन साईट हँग होणे. स्पीड स्लो होणे, ऍक्सेस न मिळणे या समस्या उद्भवतात. त्यामुळे याचा परिणाम कामकाजावर होऊन दाखले वेळेत मिळू शकत नाही.
या संदर्भात ‘वणी बहुगुणी’ने नायब तहसीलदार विवेक पांडे यांना संपर्क साधला असता त्यांनी ही तांत्रिक समस्या असून ज्या कामाला काही सेकंद लागतात त्या कामाला तासंतास लागत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव विद्यार्थ्यांना लवकरात लवकर दाखले देता येत नाही. मात्र अधिक वेळ कामकाज सुरू ठेवून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे. अशी माहिती विवेक पांडे यांनी दिली.
महिनाभर आधीच काढा दाखले
10 वी व 12 वीचा निकाल लागला की प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक दाखल्यासाठी अर्ज करतात. दरवर्षी सर्वर डाऊनची समस्या उद्भवते. त्यामुळे महिनाभर आधीच शक्य ते दाखले काढल्यास होणारा मनस्ताप थांबवता येऊ शकतो.
Comments are closed.