स्व. दत्ताजी डिडोळकर जन्म शताब्दी वर्ष निमित्त वणी येथे सभा

जितेंद्र कोठारी, वणी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या देशातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेचे संस्थापक सदस्य स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात दि. 6 ऑगस्ट 2023 पासून होत आहे. जन्मशताब्दी निमित्त वर्षभर घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्व व वर्तमान कार्यकर्त्यांची बैठक येथील नगर वाचनालयात रविवार 30 जुलै रोजी घेण्यात आली. यावेळी विद्यार्थी परिषदेचे पूर्व कालीन कार्यकर्ते सुधीर साळी यांना जिल्हा संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली.

दत्ताजी डिडोळकर जन्म शताब्दी वर्षाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्ताजी होसबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 6 ऑगस्टला नागपूर येथे होणार असून उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य नारायण मेहरे यांनी केले. देशात वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील करण्यात येणार आहे.

या बैठकीत अखिल भारतीय आयोजन समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. नारायण मेहरे, यवतमाळ विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. श्रीकांत पर्बत, विभाग संयोजक मनोज बोनगिरवार, हरिहर भागवत उपस्थित होते. उपस्थितांचा परिचय व त्यांच्या विद्यार्थी परिषदेच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर प्राचार्य श्रीकांत पर्बत यांनी दत्ताजी डिडोळकर यांच्या प्रेरणादायी जीवनाची माहिती दिली. बैठकीत 1967 पासून विद्यार्थी परिषदेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्या ताराबाई कुलकर्णी पासून आता वर्तमान स्थितीत काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीचे प्रास्ताविक गजानन कासावार यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा संयोजक हर्षल बिडकर यांनी केले. आभार प्रदर्शन नगर मंत्री नीरज चौधरी यांनी केले. वणी परिसरातील विद्यार्थी परिषदेचे काम केलेल्या पूर्व कार्यकर्त्यांनी गजानन कासावार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.