नांदेपेरा येथील शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: नांदेपेरा येथील एका शेतमजुराने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. गणपत जयराम वांढरे (55) असे मृतकाचे नाव आहे. गणपत हे नांदेपेरा येथील रहिवासी होते. दोन मुले व पत्नीसह ते राहायचे. ते मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. गणपत यांच्याकडे वडिलोपार्जित 4 एकर शेती आहे. आज सोमवारी दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचे मुले शाळेत गेले होते. तर त्यांच्या पत्नी या शेतात कामाला गेल्या होत्या. दरम्यान घरी कुणी नसल्याची संधी साधून गणपत यांनी गळफास घेतला. सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या कुटुंबीयांना घराच्या छताच्या लोखंडी ऍन्गलला गळफास घेतलेल्या अवस्थेत गणपत आढळून आले. त्यांनी याची माहिती तातडीने शेजा-यांना दिली. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. गणपत यांनी गळफास का घेतला याचे कारण अद्याप कळले नसले तरी गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यात असल्याने घरीच राहायचे अशी माहिती मिळाली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.