डॉक्टर लोढा यांच्या बदनामी विरोधात डॉक्टरांच्या संघटना आक्रमक

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठवड्यात शहरातील ज्येष्ठ चिकित्सक डॉक्टर महेंद्र लोढा यांच्याबाबत सोशल मीडियात बदनामीकारक मजकूर व्हायरल करण्यात आला. हा प्रकार डॉक्टरांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा असून अशा घटनांमुळे शहरातील डॉक्टर दबावात आले आहे. परिणामी डॉक्टरांचे मनोबल ढासळून त्याचा डॉक्टरांच्या प्रॅक्टिसवर परिणाम होत आहे. त्यामुळे डॉक्टर लोढा यांची सोशल मीडियातून बदनामी करणा-यांवर तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी आज सोमवारी दिनांक 7 ऑगस्ट रोजी शहरातील डॉक्टरांच्या विविध संघटनेद्वारा उपविभागीय अधिकारी व ठाणेदार वणी यांना निवेदन देण्यात आले.

कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वैद्यकीय प्रॅक्टिस हा एक व्यवसाय असला तरी डॉक्टर त्याकडे सेवा आणि कर्तव्य म्हणून पाहतात. मात्र अशावेळी काही अघटीत घडल्यास त्याचे खापर डॉक्टरांवर फोडण्यात येते. अनेकदा गैरसमजातून डॉक्टरांवर हल्ला देखील केला जातो. असे प्रकार सातत्याने होत असल्याने या विरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान योग्य ती कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही डॉक्टरांच्या संघटनेद्वारा देण्यात आला आहे. दरम्यान मंगळवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी काळ्या फिती बांधून शहरातील सर्व डॉक्टर रुग्ण सेवा देणार आहे.

या घटनेमागचा सूत्रधार कोण?
या प्रकरणी रुग्णांच्या कुटुंबीयांना भडकवण्यात येत आहे. सोशल मीडियात डॉ लोढा यांचा फोटो टाकून जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. डॉक्टर लोढा यांची बदनामी करणा-या प्रकारामागचा सूत्रधार शोधण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या बदनामीमागे शहरातील एक प्रसिद्ध व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे. ही व्यक्ती कोण? याबाबत सध्या विविध चर्चा रंगत आहे.

निवेदनात म्हटले आहे की डॉ. महेंद्र लोढा हे परिसरातील एक ज्येष्ठ आणि सुपरिचित चिकित्सक आहेत. त्यांचे स्वत:चे सुसज्ज असे हॉस्पिटल आहे. मात्र त्यांचा अनुभव व ज्ञानाचा सर्वसामान्य रुग्णांना फायदा व्हावा यासाठी ते ग्रामीण रुग्णालयात देखील रुग्णसेवा देतात. नवजात बाळाच्या प्रकरणी त्यांनी त्यांचे कर्तव्य योग्य प्रकारे निभावत रुग्णाला योग्य तो सल्ला दिला होता. महिलेला पुढील लेव्हलची सोनोग्राफी करण्याबाबत रेफर लेटर देखील डॉ. लोढा यांनी दिले होते. मात्र त्यांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन रुग्णाद्वारे झाले नाही.

मेडिकल कॉउंसिलच्या रिपोर्टआधीच मीडिया ट्रायलचा आरोप
या प्रकरणी नवजात बाळाच्या कुटुंबीयांतर्फे पोलीस ठाण्यात रितसर तक्रार करण्यात आली. सदर प्रकरण मेडिकल कौंसिलकडे सोपवले जाणार आहे. मेडिकल कौंसिल संपूर्ण चौकशी करून त्याचा निकाल येईल. चौकशीत जो काही निष्कर्ष येणार तो आम्हाला मान्य असेल. मात्र हलगर्जीपणा केल्याचा कुठलाही निष्कर्ष निघण्याआधीच डॉ. लोढा यांची बदनामी सुरू असून सोशल मीडियातून त्यांना ट्रोल करून मीडिया ट्रायल सुरू आहे. सदर प्रकारामुळे डॉक्टरांचे मानसिक खच्चीकरण झाले असून शहरातील संपूर्ण डॉक्टर प्रचंड तणाव व दबावात आले आहे. अशाच दबावातून डॉक्टरांनी आत्महत्येसारखे पाऊल देखील उचलल्याची घटना घडली आहे.

निवेदन देते वेळी इंडियन मेडिकल असोसिएशन वणीचे अध्यक्ष डॉ शिरिष कुमरवार, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ रमेश सपाट, होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ. किशोर कोंडावार, डेन्टल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड यांच्यासह या चारही संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.