भरधाव ट्रकची दोघांना धडक, एक जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: शौचास गेलेल्या दोघांना एका भरधाव ट्रकने जबर धडक दिली. यात एक जागीच ठार झाला तर दुसरा जखमी झाला. बुधवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास वणी-निळापूर मार्गावर हा अपघात झाला. विनोद वालुजी काळे (56) असे मृताचे नाव असून जखमीचे नाव सुहास आत्राम (40) आहे. दोघेही निळापूर (ब्राह्मणी) येथील रहिवासी आहे.

बुधवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास विनोद हे त्यांचे सोबती सुहास यांच्यासोबत शौचास गेले होते. दरम्यान निळापूर जवळून एक ट्रक (MH40 CD6635) जवळच असलेल्या एका व़ॉशरीमध्ये कोळसा भरायला जात होता. या भरधाव ट्रकने विनोद व सुहास यांना धडक दिली. या अपघातात विनोद हे ट्रकखाली चिरडल्याने जागीच ठार झाले. तर सुहास जखमी झला.

अपघात होताच ट्रकचालक ट्रक सोडून पसार झाला. दरम्यान रस्त्यावरून जाणा-या काही वाहनचालकांना अपघात झाल्याचे कळताच त्यांनी वाहन थांबवले. अपघाताची माहिती गावक-यांना दिली. गावकरी घटनास्थळी दाखल झाले. जखमी सुहासला ऍम्बुलन्स बोलवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यांनी ट्रक ताब्यात घेतला. मृतकाचे भाऊ काशिनाथ वारलुजी काळे यांच्या तक्रारीवरून अनोळखी आरोपीविरोधात भादंविच्या कलम 279, 304 अ, 337, 338 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.