जितेंद्र कोठारी, वणी : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच असून वाहन धारकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दुचाकी चोरट्यांच्या निशाण्यावर आता मोटरसायकलसह मोपेड गाड्या व वाहनाच्या बॅटरीवर असल्याचे दिसत आहे. शहरातील जैन ले आऊट येथे घराच्या बाहेर उभी असलेली अक्टिव्हा मोपेड गाडी मंगळवार 22 ऑगस्टच्या रात्री दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. तर नगर भवन येथे पार्किंग केलेल्या मालवाहू ऑटोची बॅटरीही चोरट्यांनी लांबविली.
फिर्यादी अमर आनंद अंदेवार (32) रा.जैन ले आऊट यांनी त्यांची काळया रंगाची ॲक्टिवा मोपेड क्र. MH 34 BU 0343 ही 21 ऑगस्टच्या रात्री घराबाहेर ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिले असता ॲक्टिवा दिसून आली नाही. शोध घेऊनही मोपेड मिळून न आल्याने त्यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये त्यांची ॲक्टिवा दुचाकी किंमत 30 हजार अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार दाखल केली.
तसेच फिर्यादी रोहित नारायण सोनकर (21) रा. राजीव गांधी चौक, वणी यांनी त्यांची महिंद्रा सुप्रो मालवाहू वाहन दिनांक 15 ऑगस्ट रोजी नगर भवन प्रांगणात उभा केला असता वाहनाची बॅटरी किंमत 5 हजार अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची तक्रार 22 ऑगस्ट रोजी वणी पोलीस ठाण्यात दाखल केली. दोन्ही तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुध्द कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत सतत वाढ होत असताना मात्र पोलिसांना दुचाकी चोरट्यांचा रॅकेट पकडण्यास अद्याप यश आलेले दिसत नाही.
Comments are closed.