जितेंद्र कोठारी, वणी: वणीतून शेगाव येथे दर्शनासाठी जात असलेल्या कारला एका ट्रकने भीषण धडक दिली. शनिवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास कारंजा लाड जवळ अपघात झाला. या अपघातात वणीतील नायगावकर कुटुंबातील 4 जण व चालक जखमी झाला आहे. चालकावर आधी यवतमाळ व नंतर वणी येथे तर नायगावकर कुटुंबातील चौघांवर नागपूर येथे उपचार सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे की अशोक नायगावकर (67) हे रंगारी पुरा येथील रहिवासी आहे. शनिवारी सकाळी अशाोक नायगावकर त्यांच्या पत्नी उषा, मुलगा आनंद, सून अबोली (23) व त्यांची 3 वर्षांची नात असे पाच जण व चालक राकेश गड्ड्मवार (44) हे शेगावसाठी MH29BY 9984 या कारने शेगावसाठी निघाले. दरम्यान कारंजा लाड तालु्क्यातील बोदेगाव ते सावंगी गावाला जोडणा-या नदीच्या पुलाजवळ त्यांच्या कारला एका ट्रकने जबर धडक दिली. यात 3 वर्षांची नात सोडून सर्व गंभीर जखमी झाले.
दरम्यान कारंजा येथील एक तरुण त्याच्या गावी जात होता. त्याला हा अपघात झाल्याचे कळताच त्याने तातडीने फोन करून रुग्णवाहिका बोलावली. सर्व जखमींना कारंजा लाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर चालक राकेश गड्डमवार यांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर नायगावकर कुटुंबातील 4 ही जखमींना नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Comments are closed.