जितेंद्र कोठारी, वणी : क्षुल्लक कारणावरून तिघांनी कार मधील पिता पुत्राला दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जखमी कार चालकाच्या खिशातून जबरीने मोबाईल फोन हिसकावून नेला. फिर्यादी सुभाष धोंडोजी येवले (57) रा. भालर टाऊनशीप यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक करुन गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी जप्त केली आहे. तर गुन्ह्यातील 1 आरोपी फरार आहे. अजय विनायक येमुलवार (18) व राकेश जोतीराम किनाके (24) दोघे रा. रंगनाथ नगर वणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारीनुसार फिर्यादी हा वेकोलि मध्ये नोकरीवर असून भालर वसाहत येथे वास्तव्यास आहे. दिनांक 12 सप्टेंबर रोजी फिर्यादी आपल्या कुटुंबासह कारमध्ये भालर येथून वणीकडे खरेदीसाठी येत होते. तेव्हा त्यांचा मुलगा रोहित येवले हा कार चालवीत होता. दीपक टाकीज चौपाटी येथून नगर परिषद मटण मार्केट इमारती जवळून लालगुडा जाणाऱ्या मार्गावर एका दुचाकी चालकाने बेदरकारपणे गाडी चालवून त्यांच्या कारला धडक दिली. कारचालक रोहित येवले यांनी गाडी अशी कशी चालवत आहे असे म्हंटले असता दुचाकीवरील मुलाने फोन करून इतर दोघांना बोलाविले.
चारचाकी वाहनात आलेले दोघंजण आणि दुचाकी चालक या तिघांनी हुज्जत घालून कार चालक आणि कारमध्ये बसलेले त्याच्या वडिलांना दगडाने मारहाण केली. मारहाणीत रोहित येवले हा बेशुध्द झाला तेव्हा आरोपीने त्याच्या खिशातून 35 हजार किमतीचा वन प्लस मोबाईल जबरीने हिसकावून नेला. जखमी रोहित येवले याला वणी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला नागपूर येथे रेफर करण्यात आले.
घटनेबाबत फिर्यादी सुभाष धोंडोजी येवले (57) रा. भालर टाऊनशीप यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींना अटक केली. तर एक आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मारहाणीच्या घटनेत वापरण्यात आलेली मारुती झेन क्र. MH31 EU 0887 कार पोलिसांनी जप्त केली आहे. तीनही आरोपी विरुद्ध कलम 397, 324, 34 भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे. अटकेतील दोन्ही आरोपींना 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Comments are closed.