जितेंद्र कोठारी, वणी : 2 ऑक्टो. गांधी जयंतीच्या दिवशी संपूर्ण राज्यात ड्राय डे म्हणून पाळला जातो. या दिवशी परवानाधारक दारू दुकाने बंद असल्याची संधी साधून अवैधरित्या दारू विक्री करण्याचा डाव स्थानिक गुन्हा शाखा पथकाने उधळून लावला. एलसीबी पथकाने मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत घोंसा येथे धाड टाकून 38 हजार रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला. पोलिसांनी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या फकरु संभाजी नागपुरे (70) ह्या वृद्द आरोपीला अटक केली.
स्था. गुन्हा शाखा पथकाला त्यांचे मुखबीर कडून घोंसा येथील के.जी.एन. चिकन सेंटरच्या बाजूला एका पडक्या घरात अवैधरित्या देशी दारूचा साठा विक्रीकरिता ठेवून असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. माहितीवरून एलसीबीचे स.पो.नि. अतुल मोहनकर यांनी पोलीस स्टाफ व पंचासह नमूद ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक इसम अवैधरीत्या दारू विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून रुपेश संत्रा ब्रांडच्या 180 मिलीच्या 268 शिश्या किमत 18 हजार 760 रुपये व 90 मिलीच्या 556 शिश्या किमत 19 हजार 460 असे एकूण 38 हजार 220 रुपयांची अवैध दारू जप्त केली.
एलसीबी पथकाचे पो.ह. योगेश डगवार यांची फिर्यादवरून आरोपी विरुद्ध मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही एलसीबी पथकाचे सपोनि अतुल मोहनकर, सुधीर पांडे, भोजराज करपते, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, योगेश डगवार व चालक नरेश राउत यांनी केली.
Comments are closed.