जितेंद्र कोठारी, वणी: केशव नागरी पतसंस्थेत कार्यरत लक्ष्मण रामचंद्र सिदूरकर यांच्या आत्महत्ये प्रकरणी अध्यक्षांसह सर्व संचालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लक्ष्मण यांच्या पत्नी रुपाली सिदूरकर यांनी केली आहे. पतीला सर्व संचालकांनी वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आला तसेच त्यांची आर्थिक कोंडी करण्यात आली. त्यांचे मॅनेजर पदावरून लिपिक पदावर डिमोशन करण्यात आले त्यामुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. असा आरोप रुपाली सिदूरकर यांनी तक्रारीत केला आहे. दरम्यान माजी संचालकांनी सुद्धा सर्व संचालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की पतसंस्थेच्या निवडणुकीच्या काळात आरोपींनी व काही संचालकांनी विरोधकांना आर्थिक व्यवहारासंबंधी कागदपत्रे पुरवल्याचा आरोप लक्ष्मण यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर लक्ष्मण यांना वारंवार धमकी सुरू होती. त्यांची मॅनेजर पदावरून लिपिक पदावर डिमोशन करून त्यांची आर्णी शाखेत बदली केली. त्यानंतर एकदा लक्ष्मण यांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यातून ते वाचले.
नुकतेच पतसंस्थेच्या नवीन ईमारतीच्या उद्घाटनाच्या वेळी त्यांचा अपमान करून त्यांना हाकलून दिले. त्यानंतर लक्ष्मण यांनी तुम्हाला जे पाहिजे ते स्टॅम्प पेपरवर लिहून देतो फक्त माझी बदली थांबवावी अशी विनंती केली असता आरोपींनी बदली थांबवण्यासाठी 7 लाखांची मागणी केली असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
माजी संचालकांची मागणी
मनिष निमेकर हे संस्थेचे सचिव होते. ते काही वर्षांपासून पतसंस्थेपासून दूर आहे. मात्र संस्थेचे संचालक यांनी सिदूरकर यांच्यावर निवडणुकी दरम्यान निमेकर व खाडे या विरोधी गटातील उमेदवारांना गोपनिय कागदपत्रे दिल्याचा आरोप करत त्रास देत होते. मात्र यात सिदूरकर यांचा कोणताही संबंध नव्हता असे तक्रारीत म्हणत सर्व संचालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी संचालक मनिष निमेकर यांनी केली आहे.
Comments are closed.