कटू आठवणी: बाजार समिती गोळीबार प्रकरणाला आज 17 वर्षे पूर्ण
शेतक-यांवरचा गोळीबार... वणीच्या इतिहासातील एक काळा अध्याय...
निकेश जिलठे, वणी: 17 वर्षापूर्वी वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसर मध्ये आजच्या दिवशी शेतक-यावर गोळीबार झाला होता. या गोळीबाराच्या कटू आठवणीने झालेली जखम आजही वणीकरांच्या मनात ओली आहे. 8 डिसेंबर 2006 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दिनेश घुगुल या शेतक-याचा मृत्यू झाला होता, तर 4 शेतकरी जखमी झाले होते. लाठीचार्जमध्ये 15 शेतकरी जखमी झाले. तर दगडफेकीत 10 पोलीस देखील जखमी झाले होते. या घटनेला आज तब्बल 17 वर्षे उलटली आहेत. या घटनेच्या कटू स्मृती, आठवणींनी आजही अनेकांना हळहळ वाटते.
काय झाले होते नेमके त्या दिवशी?
ता. 8 डिसेंबर 2006. शुक्रवारचा दिवस होता. ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर. तीन दिवसांपासून सीसीआयची कापसाची खरेदी बंद होती. त्यामुळे तिथे हजारो गाड्या उभ्या होत्या. शुक्रवारी कापूस खरेदी सुरू झाली. मात्र काही कापसाची खरेदी झाल्यानंतर खरेदी अचानक बंद झाली. त्यामुळे शेतक-यांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. त्यातील काहीजण हिंसक झाले. संतप्त झालेल्या काही शेतक-यांनी ग्रेडरला चोप दिला. वातावरण चिघळल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. मात्र घटनास्थळी तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. तर प्रतिउत्तर म्हणून संतप्त शेतक-यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली.
अचानक झालेल्या दगडफेकीमुळे पोलिसांनी बचावासाठी पळ काढला. तर ग्रेडरने कार्यालयाकडे धाव घेत कार्यालयाचा दरवाजा आतून बंद केला. संतप्त शेतक-यांनी कार्यालयाच्या बाहेर सामानाची प्रचंड नासधूस केली. तर काहींनी परिसरातील 3 दुचाकी व 2 सायकली जाळल्या.
दुपारी 3.45 वाजता तत्कालीन जिल्हा पोलिस अधिक्षक अब्दुल रहमान आपल्या ताफ्यासहीत घटनास्थळी हजर झाले. परंतु परिस्थिती हाताबाहेर जातेय असं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी गोळीबाराचे आदेश दिले. यात 1 निष्पाप शेतक-याला आपला प्राण गमवावा लागला. तर 4 शेतकरी जखमी झाले. लाठीचार्जमध्ये 15 शेतकरी जखमी झाले. तर दगडफेकीत 10 पोलीस जखमी झाले होते. शहरात तनावपूर्ण परीसथिती पाहता प्रशासनाने 9 डिसेंबर दुपारी 3 वाजता कर्फ्यू लावला. हा कर्फ्यू 11 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू होता. या आठवणी आजही वणीकरांच्या मनात ताज्या आहेत.
मनावर जखम कायम
गोळीबाराबाबत अनेक तर्कवितर्क लावेल जात होते. असा दावा केला गेला होता की कॉलेज सुटल्याने काही मुलं या भागात गेले होते. पुढे पोलिसांनी अनेक दिवस व्हिडीओ कॅमे-याचे फुटेज पाहून याचा तपास केला. संशयाच्या कारणावरून अनेकांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. अखेर या गोळीबार प्रकरणात तब्बल 44 आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गेल्या सतरा वर्षांपासून हे शेतकरी न्यायालयाच्या चकरा मारीत आहेत. त्यावेळी घटनास्थळी असलेले काही शेतकरी आंदोलक नेते आज मोठ्या पदावरही आहेत.
वणीच्या इतिहासात टिळक चौक परिसरात झालेल्या गोळीबारानंतर हा दुसरा गोळीबार होता. आज शेतक-यांसमोर विक्रीसाठी अनेक पर्याय आहे. आता तशी परिस्थिती निर्माण होणे कठिण असली तरी, शेतक-यांच्या मनावर ही जखम कायम राहील.
Comments are closed.