परिसरात कापसावर आधारित उद्योग सुरु व्हावेत – संजय खाडे

संजय खाडे यांचा धनोजे कुणबी संस्थेतर्फे सपत्नीक सत्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मी एक शेतक-यांच्या मुलगा असल्याने त्यांच्या समस्या व व्यथांची मला जाण आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळणे ही सध्या शेतक-यांसाठी सर्वात मोठी समस्या आहे. लांब धाग्यांच्या कापसाची लागवड केल्यास शेतक-यांना अधिक भाव मिळू शकतो. त्यासाठी शेतक-यांमध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच परिसरात कापसावर आधारीत उद्योग सुरु झाले पाहिजे, असे प्रतिपादन संजय खाडे यांनी केले. नुकतीच त्यांची महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन पणन महासंघाच्या संचालकपदी निवड झाली. त्यामुळे मंगळवारी दिनांक 16 जानेवारीला धनोजे कुणबी समाज सांस्कृतिक भवन, साधनकर वाडी येथे संजय खाडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. धनोजे कुणबी समाज संस्थेतर्फे श्री जगन्नाथ महाराज वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे राजेश पहापळे होते तर अनंत एकरे व नामदेव जेनेकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात जगन्नाथ महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या पूजेचा मान संजय खाडे व त्यांच्या पत्नी तसेच नरेंद्र मिलमिले आणि त्यांच्या पत्नीला मिळाला. पूजेनंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सत्कार समारंभाला सुरुवात झाली. संजय खाडे आणि त्यांच्या पत्नी संगीता खाडे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी शेतक-यांविषयीचे धोरण स्पष्ट केले. 

सत्कार सोहळ्यानंतर तुकडोजी महाराज आणि जगन्नाथ महाराज यांची पालखी काढण्यात आली. पालखी नंतर भजन स्पर्धेला सुरुवात झाली. कार्यक्रमाला टिकाराम कोंगरे, अशोक चिकटे, मुरलीधर भोयर, नरेंद्र मिलमिले, रामराव गोहोकार, रमेश पेचे, नितीन मोहितकर, संजय पोटे, बाळकृष्ण राजूरकर, संजय पेचे, गोविंदराव थेरे, आशिष मोहितकर, जितेंद्र बोर्डे, अमोल टोंगे, धीरज डाहुले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचलन दिगांबर गोहोकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार नामदेव जेनेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन मंडळाचे कव़डू नागपूर, किशोर मिलमिले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील दीड हजार नागरिकांची उपस्थिती होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.