विवेक तोटेवार, वणी: आबई फाट्यावरून शिंदोला येथे अवैधरीत्या रेती भरून जात असलेला एक ट्रॅक्टर शिरपूर पोलिसांनी पकडला. ही कारवाई 13 मार्च रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत एका आरोपीला अटक केली तर 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शिरपूर पोलिसांना रात्री 3 वाजताच्या सुमारास आबई फाट्याजवळ पेट्रोलिंग दरम्यान एक लाल रंगाचे ट्रॅक्टर येताना दिसेल. ट्रॅक्टर थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये रेती असल्याचे दिसून आले. ट्रॅक्टर चालक पंढरीनाथ नामदेव कोडपे (39) रा. चिखली याला रेतीच्या परवण्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे वाहतुकीचा परवाना नसल्याचे आढळले.
पोलिसांनी ट्रॅक्टर MH 29BV 6422, ट्रॅक्टर चालक पंढरीनाथ व रेती याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 (15), 379, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 48 (7) नुसार गुन्हा दाखल केला. पंढरीनाथ याच्याकडून ट्रॅक्टर व रेती असा एकूण 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तालुक्यात रेती तस्करी जोमात
वणी तालुक्यात सध्या रेती तस्करीला चांगलाच ऊत आला आहे. तस्करांद्वारे नियमांना धाब्यावर बसवून रेतीचे उत्खनन सुरू आहे. रेती माफियांमुळेच नदीच्या अस्तित्वावर देखील संकट ओढावले आहे. काही ठिकाणी तर नदीचा प्रवाह दुसरीकडे काढून त्या ठिकाणाहून रेती उत्खनन सुरू आहे. यामुळे पर्यावरणाला तर नुकसान होतच आहे परंतु शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
Comments are closed.