विवेक तोटेवार, वणी: बिल्डिंग मटेरिअल ठेवलेल्या गोदावूनची रखवाली करणा-या चौकीदाराची निर्घृण हत्या करण्यात आली. आज सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. जीवन झाडे असे मृतकाचे नाव आहे. या घटनेत दरोडेखोरांनी गोडावूनसमोर ठेवलेले 4 बंडल सळाखी चोरून नेल्या आहेत. परिसरात चोरटे व दरोडेखोरांचा हैदोस सुरुच आहे. याच महिन्यात पटवारी कॉलोनीत दरोडा पडला होता. चोरीच्या घटनांमुळे वणीकर त्रस्त झाले आहेत. आता चोरट्यांची मजल चोरी करण्यासाठी हत्या करण्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक जीवन झाडे (60) रा. आष्टोना ता. राळेगाव येथील रहिवासी होते. यवतमाळ रोडवरील एका बारच्या शेजारी खिवंसरा यांच्या मालकीचे बिल्डिंग मटेरिअलचे दुकान आहे. दुकानाचे पळसोनी फाटालगत गोडावून आहे. या गोडावूनच्या आता सिमेंट व ईतर वस्तू तर बाहेर सळाखी ठेवलेल्या आहेत. जीवन हे गेल्या 10 वर्षांपासून या गोडावूनची रात्री रखवालदारी करायचे. रविवारी दिनांक 28 एप्रिल रोजी रात्री ते नेहमीप्रमाणे कामासाठी आले. मात्र सकाळी त्यांचा मृतदेह गोडावूनसमोर आढळून आला.
मध्यरात्री काय घडले?
रात्री 12 पर्यंत या भागात नागरिकांची रेलचेल सुरु असते. त्यामुळे मध्यरात्री या ठिकाणी दरोडेखोर पोहोचले. त्यांनी जीवन यांच्या डोक्यावर प्रहार केला. या प्रहारामुळे ते बेशुद्ध झाले व रात्रभरात अतिरक्तस्रावाने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गोडावूनसमोर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. सकाळी सीसीटीव्ही फोडलेले आढळले. या घटनेत सळाखीचे 4 बंडल (240 किलो किंमत 14000 रुपये) चोरीला गेले आहेत. तर 2 बंडल रस्त्याच्या कडेला ठेवल्याचे सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे चोरट्यांनी 6 बंडल चोरीच्या उद्देशाने उचलल्याचा अंदाज बांधला जात आहे.
सकाळी दुकानाचे सुपरवायझर गोडावून मध्ये गेले असता ही घटना उघडकीस आली. सुपरवायझरने याची माहिती मालकाला दिली. मालकांनी तातडीने याची माहिती वणी पोलिसांना दिली. वणी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Comments are closed.