भरदिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणी 2 चोरट्यांना अटक

सहारा पार्क येथे पावने दोन लाखांची धाडसी चोरी, आरोपी चोरटे नागपूरचे

बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा रोडवरील सहारा पार्क येथे भरदिवसा झालेल्या पावने दोन लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडीया (29) पंकज श्रावण खोकरे (31) दोघेही राहणार हुडकेश्वर नागपूर असे आरोपींची नावे आहेत. हे दोघेही सराईत चोरटे आहेत. दोन दिवसांआधीच पळसोनी फाट्याजवळील दरोडा व खुनाच्या आरोपींना कारंजा येथून अटक करण्यात आली होती. तर आता घरफोडीच्या दोन आरोपींना नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे वणी हे बाहेरगावातील चोरट्यांचे घरफोडी व दरोडे टाकण्याचे ठिकाण होत असल्याचे समोर येत आहे.

शंकर किसन घुग्गुल हे सहारा पार्क वणी येथे आपल्या कुटुंबासह राहतात. ते एका खासगी शाळेत शिक्षक आहेत. तर त्यांची पत्नी ही रुग्णालयात नर्स आहे. 8 फेब्रुवारी रोजी शंकर हे सकाळी 7.35 ला शाळेत निघून गेले. तर त्यांची पत्नी ही सकाळी 10.15 वाजता घराला कुलूप लावून नोकरीसाठी निघून गेली. दुपारी शंकर यांच्या पत्नीला शेजा-यांनी घरफोडी झाल्याची माहिती दिली. या घरफोटीत चोरट्यांनी रोख रकम व दागिन्यांसह 1 लाख 73 हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. भरदिवसा घरफोडी झाल्याने या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली होती.

या प्रकरणाचा तपास ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे प्रमुख बलराम झाडोकर करीत होते. त्यांनी सीसीटीव्हीची तपासणी केली असता त्यांना दोघांनी घरफोडी केली व घरफोडीनंतर ते दुचाकीने नागपूरच्या दिशेने गेल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी वणी ते नागपूर असे संपूर्ण सीसीटीव्ही शोधले. दरम्यान बुटीबोरी जवळील सीसीटीव्हीत चेहरा येऊ नये म्हणून त्यांनी कच्च्या रस्त्याचा वापर करीत नागपूर गाठले.

पोलीस पथकाने नागपूर येथील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता त्यांना इतर सीसीटीव्हीत दोन्ही चोरट्यांचा चेहरा दिसून आला. त्यावरून त्यांनी फोटो प्रिंट करून आरोपींचा नागपूर येथे जाऊन तपास केला. मात्र या काळात आरोपींना दुस-या चोरीच्या प्रकरणात अटक झाली होती. यातील एक आरोपी नागपूर तर दुसरा आरोपी भंडारा येथील कारागृहात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींचा ताबा मिळवून माहिती घेतली असता वणीतील चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाला.

आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरट्यांनी चोरीचे दागिने नागपूर येथील एका सोनाराच्या दुकानात गहाण ठेवले होते. मात्र आरोपींनी वेळेत दागिने न सोडवल्याने त्याची गलाई करण्यात आली. पोलिसांनी 34.82 ग्रॅम सोन्याची लगड जप्त केली. प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे बलराम झाडोकार करीत आहे.

सदर कारवाई डॉ. पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, गणेश किंद्रे उप.वि.पो.अ.वणी, पोलीस निरिक्षक/अनिल बेहेराणी ठाणेदार वणी यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पो.उप.नि/बलराम झाडोकार, सुदाम आसोरे, पोहेकॉ/सुहास मंदावार, विकास धडसे, पोना/पंकज उंबरकर, पोकों/मो. वसीम, शाम राठोड, विशाल गेडाम, भानु हेपट, विकास ब्राम्हण यांनी पार पाडली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.