भाजपने पडद्यामागून मदत केल्याचा अर्थ काय?

खा. प्रतिभा धानोरकर यांच्या वक्तव्यात तथ्य की राजकीय?

निकेश जिलठे, वणी: वणी येथील आभार सभेत खा. प्रतिभा धानोरकर यांनी भाजपच्या अनेक नेत्यांनी पडद्यामागून मदत केल्याचा दावा केला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष करून भाजपमध्ये याबाबत कुजबूज सुरु झाली आहे. मात्र धानोरकर यांच्या वक्तव्यात तथ्य होते, की भाजपच्या काही नेत्यांना मुद्दाम कोंडीत पकडण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले. याबाबत आता विविध चर्चा रंगत आहे.

वक्तव्यामुळे भाजपचे नेते कोंडीत !
धानोरकर यांच्या या वक्तव्याची सर्व प्रथम बातमी ‘वणी बहुगुणी’ने दिली होती. त्यांच्या या वक्तव्याला राज्यभरातील प्रमुख मीडियाने प्रसिद्धी दिली. राज्यातील प्रमुख वृत्तपत्र व टीव्ही चॅनलवर ही बातमी झळकली. राज्यभरात प्रसिद्धी नंतर संपूर्ण मतदारसंघ या वक्तव्याने ढवळून निघाला. खासकरून या वक्तव्याची चंद्रपूर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली. मीडिया रिपोर्ट्समधून सध्या भाजपमधल्या काही कुणबी नेत्यावर संशयाची सुई उपस्थित केली जात आहे.

गेल्या निवडणुकीच्या वेळी भाऊ गटाने भय्याचे काम केले नाही, असा आरोप होत होता. मात्र धानोरकर यांच्या जाहीर वक्तव्याने आता भय्या गटाने परतफेड केली, अशी देखील दावा मीडिया रिपोर्ट्समधून होत आहे. मात्र या वक्तव्यामुळे भाजपचे नेते कोंडीत पडले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वक्तव्यात तथ्य की राजकीय?
निवडणुकीत कुणी पडद्यामागून मदत केली हे जाहीर रित्या सांगितले जात नाही. यामुळे मदत करणा-याचे राजकीय करीअर धोक्यात येण्याची शक्यता असते. शिवाय पुढल्या वेळी मदत मिळण्याचे दरवाजे कायमचे बंद होतात. त्यामुळे कुणी मदत केली, तरी उमेदवार ते गुलदस्त्यात ठेवतो. मात्र हा धोका पत्करून धानोरकर यांनी हे वक्तव्य तर केले नसावे, असाही एक मतप्रवाह आहे. तर अनेकदा निवडणुकीनंतर विजयी उमेदवार असे राजकीय वक्तव्य करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना कोंडीत पकडतो, त्यामुळे हे एक सर्वसामान्य राजकीय वक्तव्य असून यात काहीही तथ्य नाही, असा ही एक मतप्रवाह आहे.

खा. प्रतिभा धानोरकर यांच्या वक्तव्यात किती तथ्य आहे हे अद्याप कळू शकले नाही. भविष्यात याचे काही पुरावे त्या देणार का? शिवाय त्यांचे हे वक्तव्य गांभीर्याने घेऊन याची भाऊ परतफेड करणार का? याकडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.