रोहन आदेवार, वणी: वेगळा विदर्भ झाला तरच विदर्भाच्या समस्या सुटू शकतात असे प्रतिपादन विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी केले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने बालाजी पॉलिटेक्निक महाविद्यालय सावर्ला येथे मंगळवारी 23 जानेवारीला दुपारी 12 वाजता वेगळा विदर्भ का? या विषयावर चर्चासत्र ठेवण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनराव चटप होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे यवतमाळ जिल्हा प्रमुख प्रा. पुरुषोत्तम पाटील, कोर कमिटी सदस्य रफिक रंगरेज, युवक यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राहूल खारकर, प्राचार्य अमित रायपुरे हे होते.
यावेळी मान्यवरांनी यांनी आपल्या भाषणातून वेगळ्या विदर्भाची आवश्यकता का आहे यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच विदर्भातील विविध प्रश्न, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, सिंचनाचा अनुशेष, विजेचे दर,लोडशेडिंग, शेतीमालाला योग्य भाव इत्यादी मुद्यावर वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मिती शिवाय वरील प्रश्नांची सोडवणूक शक्य नाही त्यासाठी विदर्भातील जनतेनी व विध्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना वेगळ्या विदर्भ राज्याची शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सोनटक्के यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन प्रा.ताजने यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भवादी मित्र दीपक नरवडे, कमलेश भगत तसंच बालाजी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.