घरकुल लाभार्थ्यांच्या थकीत अनुदानासाठी मनसे आक्रमक

रेती उपलब्ध करून देण्याचीही मागणी

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील घरकुल लाभार्थीना त्वरित अनुदान व बांधकामासाठी रेती उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यात सध्या रमाई, पंतप्रधान व शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. या योजनेअंतर्गत त्यांना घरकुल बांधण्याकरिता पहिला व दुसरा टप्पा अनुदानाचा वितरित करण्यात आला. तर कुठे कुठे पहिल्या टप्प्यावरच काम थांबलेले आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा न झाल्याने कामे पूर्णतः ठप्प झाली आहेत.

सद्यःस्थितीत पावसाचे दिवस असून या लाभार्थ्यांना उघड्यावर आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. परिणामी लाभार्थ्यांना मात्र मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच लाभार्थीच्या नावाने पाच ब्रास रेतीची नोंद असून त्यांना केवळ दोन ब्रास रेती दिली जात आहे. तसेच ज्या लाभार्थीना त्यांच्या गावाजवळील डेपोवरूनच रेती देण्यात यावी, जेणेकरून लाभार्थीना कमी खर्च येईल. ज्या रेती डेपोचालकांनी लाभार्थीची फसवणूक करून पाच ब्रासऐवजी त्यांना दोन ब्रास रेती दिली, अशा डेपोधारकांविरुद्ध कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे.

येत्या आठ दिवसांत घरकुल योजनेचे उर्वरित अनुदान, तसेच लाभार्थीना जवळील डेपोमधून रेती उपलब्ध करून न दिल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार व कार्यकर्त्यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदन देते वेळी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.