मेंढोली येथे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

चिमुकल्या मुलीला सोडून बापाचे टोकाचे पाऊल

बहुगुणी डेस्क, वणी: मेंढोली येथील एका 33 वर्षीय विवाहित तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. आज बुधवारी दिनांक 10 जुलै रोजी सकाळी 8.45 च्या सुमारास ही घटना घडली. राकेश नत्थू उलमाले (33) असे मृताचे नाव आहे. तो त्याची पत्नी, मुलगी व वडिलांसह राहायचा. त्यांच्या वडिलांच्या नावे मेंढोली व वरझडी परिसरात शेती आहे. ही घरची शेती तो सांभाळायचा.

Podar School 2025

राकेशच्या अडिच वर्षांच्या मुलीला बरे नव्हते. त्यामुळे सकाळी राकेशची पत्नी मुलीला घेऊन दवाखान्यात गेली होती. तर राकेशचे वडील हे बाहेर होते. घरी कुणी नसल्याची संधी साधून राकेशने घरी शेतीच्या कामासाठी आणलेले कीटकनाशक प्राशन केले. काही वेळाने राकेशचे वडील घरी आले. तेव्हा त्यांना त्यांच्या मुलाने कीटकनाशक प्राशन केल्याचे लक्षात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांनी याची माहिती शेजा-यांना दिली. काही लोकांच्या मदतीने राकेशला वणी येथे रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात येत होते. मात्र वाटेतच राकेशचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेची नोंद करत मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. उत्तरिय तपासणीनंतर मृतदेह राकेशच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. संध्याकाळी राकेशवर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

राकेशने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. राकेशच्या पश्चात पत्नी, मुलगी, वडील व आप्तपरिवार आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे.

Comments are closed.