वणी तालुक्यात पावसाची संततधार, नायगाव येथे खचले घर

अल्पभूधारक शेतक-याला संजय खाडे यांची मदत

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या एक आठवड्यापासून संपूर्ण तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान तर झाले आहे, शिवाय अनेकांच्या घराचे देखील नुकसान झाले आहे. नायगाव (खु.) येथील रहिवासी असलेल्या एका अल्पभूधारक शेतक-याचे पावसामुळे घर खचले. संजय खाडे यांना याची माहिती मिळताच त्यांनी नायगाव येथे सहका-यांसह भेट दिली व शेतक-याला आर्थिक मदत केली. तसेच शासकीय नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करण्याचे वचन दिले. यामुळे शेतक-याला दिलासा मिळाला आहे.

दीपक जनार्धन तुराणकर (55) हे तालुक्यातील नायगाव (खु.) येथील रहिवासी आहेत. ते अल्पभूधारक आहेत. त्यांची परिस्थिती जेमतेम आहे. गेल्या एक आठवड्यापासून तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दीपक यांचे मातीचे घर खचले. त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. त्यांनी संजय खाडे यांच्या चालतं फिरतं जनहित केंद्रात याबाबत माहिती दिली. संजय खाडे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सहका-यांसह नायगाव गाठले व तुराणकर कुटुंबीयांची भेट घेतली.

त्यांनी तातडीने ताडपत्री व उदरनिर्वाहसाठी काही रोख रकमेची मदत केली. शासनाकडून तात्काळ आर्थिक मोबदला मिळावा यासाठी पाठपुरावा करण्याचे वचन दिले. याशिवाय त्यांना शासनाच्या योजनेंतर्गत पक्के घऱ मिळावे यासाठी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

जिथे गरज, तिथे हजर – संजय खाडे
लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनहित केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. चालतं फिरतं जनहित केंद्र हे जिथे गरज तिथे हजर या तत्वावर काम करते. याशिवाय नागरिकांना खाती चौक येथे असलेल्या जनहित केंद्राला भेट देता येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी काही समस्या असल्यास जनहित केंद्राला भेट द्यावी. शक्य असल्यास या समस्या सोडवण्याचा केंद्रातर्फे प्रयत्न केला जाईल.
– संजय खाडे, जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस

संजय खाडे यांनी यावेळी नायगाव येथील नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. खाडे यांच्या मदतीमुळे तुराणकर कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. यावेळी पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, प्रा. शंकर व-हाटे, तेजराज बोढे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.