धक्कादायक – वणी विधानसभा क्षेत्रात 382 शिक्षकांची पदे रिक्त

किमान 200 शिक्षण स्वयंसेवकांची तात्काळ भरतीची संजय खाडे यांची मागणी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी, झरी व मारेगाव तालुक्यात 382 शिक्षकांची कमतरता आहे. अनेक शाळा एक शिक्षकी आहे तर 9 शाळेत शिक्षकच नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने तातडीने खनिज विकास निधीतून किमान 200 शिक्षण स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी केली आहे. याबाबत त्यांच्या नेतृत्त्वात खा. प्रतिभा धानोरकर व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

सध्या वणी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 139 शाळा आहेत. यात 512 शिक्षकांची गरज असून सध्या येथे फख्त 336 शिक्षक कार्यरत आहेत. तर 186 जागा अद्याप रिक्त आहेत. मारेगाव तालुक्यात 104 शाळा असून यात 297 शिक्षकांची गरज आहेत. मात्र येथे 216 शिक्षक असून 81 पदे अद्यापही रिक्त आहेत. तर झरी तालुक्यात 116 शाळा असून यात 346 शिक्षकांची गरज आहेत. मात्र येथे 231 शिक्षक कार्यरत असून अद्याप 115 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रात 382 शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

शासनाचा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ – संजय खाडे
वणी विधानसभेत अनेक शाळा या एक शिक्षकी आहेत. या संपूर्ण शाळेचा डोलारा एकाच शिक्षकावर आहे. एक शिक्षक सर्व वर्ग कसे सांभाळणार? गंभीर बाब म्हणजे झरी तालुक्यात 9 शाळा अशा आहेत ज्यात एकही शिक्षक नाही. गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी शासन खेळ करीत आहे. आमचा खनिज निधी कुठे जात आहे? जर शिक्षण स्वयंसेवकांची मागणी केली गेली नाही तर आंदोलन पुकारले जाईल.
– संजय खाडे, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस

बिम्मडदेवी, कर्बाडा, येवती, राजूरगोटा, परसोडी, बोटोणीपाल, आंबेजरी गिजारा, येसापूर व पांढरकवडा (ल.) या शाळेत एकही शिक्षक नाहीत. गेल्या वर्षी शासनाने मानधन तत्वावर वणी विधानसभा क्षेत्रात 186 शिक्षण स्वयंसेवकांची नियुक्ती केली होती. मात्र यावर्षी शाळा सुरू होऊन सव्वा महिना झाला तरी अद्यापही शिक्षण स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

परिसरातून मोठ्या प्रमाणात शासनाला खनिजाद्वारे महसूल मिळतो. त्यामुळे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात खनिज विकास निधी मिळतो. मात्र हा निधी आपल्याच भागात खर्च केला जात नाही. ही गंभीर बाब असून शासनाने त्वरित वणी तालुक्यात 100, मारेगाव व झरी तालुक्यात प्रत्येकी 50 अशा 200 शिक्षण स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, अशी मागणी संजय खाडे यांनी निवेदनातून केली आहे.

खा. प्रतिभा धानोरकर यांनाही निवेदन देण्यात आले.

निवेदन देते वेळी पुरुषोत्तम आवारी, प्रा. शंकर व-हाटे, तेजराज बोढे, टिकाराम कोंगरे, अनिल देरकर, प्रमोद वासेकर, उत्तमराव गेडाम, जयसिंग गोहोकार, संध्या बोबडे, अनिल भोयर, मारोती मडावी, नंदेश्वर आसुटकर, रवि कोटावार यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.