संजय देरकरांची संपर्क प्रमुखांना हाताशी धरून पक्षात गटबाजी

विश्वास नांदेकर यांचा घाणाघात, पत्रकार परिषदेत अनेक खळबळजनक आरोप

विवेक तोटेवार, वणी: संजय देरकर हे संपर्क प्रमुखांना हाताशी धरून पक्षात गटबाजी करीत आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी केला आहे. संजय देरकर हे पक्षाचा प्रोटोकॉल न पाळता शाखा फलकाचे अनावरण करीत आहे. अधिकार नसताना पद वाटप करीत आहे. हा अधिकार संजय देरकर यांना कुणी दिला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आज बुधवारी दिनांक 7 ऑगस्ट रोजी नांदेपेरा रोड येथील प्रसाद लॉज येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत त्यांनी देरकर यांच्यावर विविध खळबळजनक आरोप केले. यामुळे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

देरकरांचा पक्षात गटबाजीचा प्रयत्न
पक्षातील जे पदाधिकारी अकार्यक्षम होते त्यांना संपर्क प्रमुखांच्या संमतीने पदावरून दूर करण्यात आले होते. बोढेकर यांना आधीच तालुका प्रमुख पदावरून काढण्यात आले. याशिवाय महिला आघाडीच्या संघटिका यांचे पती लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करीत होते. त्यामुळे त्यांचे पद काढण्यात आले होते. अजय चन्ने यांना उपशहर प्रमुख पदावरून कमी करण्यात आले. मात्र असे पदावरून कमी करण्यात आलेले लोक संपर्क प्रमुख व देरकर यांना हाताशी धरून अद्यापही पद लावत आहे. ही भामटेगीरी असून ते गटबाजीला खतपाणी घालीत आहेत. असेही विश्वास नांदेकर म्हणाले.

शाखा फलक कार्यक्रमावर टीका
मंगळवारी दिनांक 6 ऑगस्ट रोजी टागोर चौक येथे शाखा फलकाचे अनावरण केले. त्यावर दोन्ही उपजिल्हा प्रमुखांचे नाव नाही. 7 ऑगस्ट रोजी झरी तालुक्यातील माथार्जुन येथे शाखा स्पापन केली. पण या ठिकाणी पक्षाची आधीच शाखा होती. संजय देरकर यांनी काही भाजप व मनसेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत नवीन शाखा स्थापन केली. शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख यांच्या नेमणुका करण्याचा अधिकार फक्त तालुका प्रमुख, शहर प्रमुख व जिल्हा प्रमुखांना आहे. मात्र कोणताही अधिकार नसताना देरकर सध्या पद वाटप करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

देरकरांची फक्त उमेदवारीसाठी धडपड
देरकर हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर केवळ पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी सक्रीय झाले आहेत. त्यांना कोणत्याही पक्षाची उमेदवारी चालते. उद्या त्यांना भाजप, शिंदे गट, काँग्रेस अशा कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली तरी ते घेणार. आम्ही गेल्या 30 वर्षांपासून पक्षात काम करीत आहोत. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. तर देरकर हे कोणत्याही पक्षाशी एकनिष्ठ नाहीत. हे शिवसैनिक व पदाधिका-यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांचे मनसुभे आम्ही उधळून लावणार, असा इशारा देखील नांदेकर त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेत वणी विधासभा संपर्क प्रमुख विजयानंद पेडणेकर, जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, महिला जिल्हा संघटिका योगिता मोहोड, उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, उपजिल्हा प्रमुख शरद ठाकरे, तालुका प्रमुख शरद ठाकरे, चंद्रकांत घूग्गुल, संजय आवारी, सीमा विशाल आवारी, सुरेखा भोयर, वनिता काळे, सुधीर थेरे, संजय बीजगणवार, अभय चौधरी, भाग्यश्री वैद्य, सपना केलोदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Comments are closed.