750 पेक्षा अधिक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित
वन्य प्राण्यांचा शेतात हैदोस, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात निवेदन
पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालु्क्यात शेकडो शेतक-यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केले आहे. शासनाने त्यांचा पंचनामा केला. मात्र अद्यापही साडे सातशे पेक्षा अधिक शेतक-यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. अखेर त्रस्त झालेल्या शेतक-यांनी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांची भेट घेत त्यांना ही समस्या सांगितली. मंगळवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात वन विभागाला याबाबत निवेदन देण्यात आले. जर 15 दिवसात प्रशासनाने दखल घेतली नाही. तर वनविभाग कार्यालयासमोर शेतक-यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संजय खाडे यांनी दिला.
वणी तालुक्यात वर्ष 2023-24 या काळात 996 शेतक-यांच्या शेतात वन्य प्राण्यांनी अतोनात नुकसान केले. या नुकसानीचा वनविभागातर्फे पंचनामा सुद्धा झाला. मात्र आतापर्यंत केवळ 240 लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. तर उर्वरीत 756 शेतकरी लाभापासून वंचित आहे. लाभापासून वंचित असलेल्या शेतक-यांचा आकडा मोठा आहे. यासाठी 20 लाखांचा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
अन्यथा तीव्र आंदोलन – संजय खाडे
नुकसानग्रस्त शेतक-यांना एक महिन्याच्या आत भरपाई देणे गरजेचे आहे. वनमंत्री हे आपल्या लोकसभा मतदार संघातीलच रहिवासी आहेत. मात्र त्यांच्याच मतदारसंघातील शेतकरी लाभापासून वंचित आहे. ही शरमेची बाब आहे. शेतक-यांचे नुकसान होत असताना कार्यालयात अधिकारी हजर नसतो. शासन, प्रशासन दोघांचेही शेतक-यांकडे दुर्लक्ष आहे. जर येत्या 15 दिवसात शेतक-यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, तर कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– संजय खाडे, जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस
निवेदन देते वेळी पुरुषोत्तम आवारी, प्रा. शंकर व-हाटे, अशोक चिकटे, तेजराज बोढे, महेश वैद्य, अशोक पांडे, पीएस उपरे, पवन शा. एकरे, प्रेमनाथ मंगाम, प्रफुल्ल उपरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
Comments are closed.