शिक्षण विभागातर्फे होतकरू विद्यार्थ्यांचा सन्मान
वणी: वणी येथील पंचायत समिती शिक्षण विभाग वणीच्या वतीने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान तर्फे ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानाअंतर्गत कठीण परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या 150 माध्यमिक विद्यार्थ्यांचा येथील वसंत जिनिंगच्या सभागृहात सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती संजय पिंपळशेंडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उदघाटन सभापती लिशाताई विधाते यांनी केले.
विशेष अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त समाजसेविका राणानुर सिद्दीकी, ऍड.देविदास काळे, गटविकास अधिकारी राजेश गायनर, डॉ.सुषमा खनगन, जि.प.सदस्य बंदुभाऊ चांदेकर, संघदीप भगत, पंचायत समिती सदस्या चंद्रज्योती शेंडे, शीला कोडपे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दीनानाथ आत्राम, राज्यपुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार, हायस्कुलचे मुख्याध्यापक सुनील चोपणे, विनोद ताजने, जिल्हा शिक्षण प्रशिक्षणचे प्रा.भालेराव, प्रा.सिरसे, पोषण आहार अधिक्षक मेश्राम गट समन्वयक प्रकाश नागतुरे व सर्व केंद्र प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात स्वागत गीत जि.प.शाळा गणेशपूरच्या विद्यार्थिनींनी गायले.प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी केले. विनोद नासरे यांनी उपस्थित सत्कार मूर्तींचा परिचय करून दिला. दीनानाथ आत्राम यांनी शिक्षण घेताना त्यांनी सोसलेल्या यातनाची माहिती उपस्थितांना करून दिली. सुनीता वैद्य या अंध दिव्यांग फिरत्या शिक्षिकेने आपल्याकडे जे नाही याचा विचार करत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा पूर्णपणे उपयोग करून घ्या, असा संदेश दिला. या प्रसंगी अतिथीनी समयोचित मार्गदर्शन केले. त्याआधी नाजीरा शेख व अनिकेत उईके या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
उदघाटन पर भाषण करताना लिशाताईनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाची जिद्द सोडू नये. सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अडचणींचा सामना करून प्रगती करा असा संदेश दिला. अध्यक्षीय भाषण करताना पिंपळशेंडे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले पाहिजे. नोकरीसाठी शिक्षण न घेता अर्थोत्पादनाची क्षमता प्राप्त करण्यासाठी शिक्षण घेऊन आई वडील व गुरुजनांच्या अपेक्षा पूर्ण करा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधन व्यक्ती निशा चौधरी यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सर्व केंद्र प्रमुख, व साधन व्यक्तींनी परिश्रम घेतले.