वणीत आज महापरिनिर्वाणदिनी ‘एक वही, एक पेन’ अभियान

शैक्षणिक साहित्य वाटप करून अभिवादन करण्याचे आवाहन

बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनी वणीत ‘एक वही एक पेन’ अभियान राबवण्यात येत आहे. हजारो अनुयायी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येतात. यावेळी येताना नागरिकांनी ‘एक वही व पेन’ असे शैक्षणिक साहित्य सोबत आणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शैक्षणिक पद्धतीने अभिवादन करूया, असे आवाहन यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटच्या (YIOAM) तरुणाईने केला आहे. सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत हे अभियान राबवण्यात येत आहे.

दरवर्षी मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पुष्पहार, पुष्पचक्र, मेणबत्ती व उदबत्ती पुतळ्याजवळ आणली जाते. यावेळी मोठ्या प्रमाणात फुलहार जमा होतात. मात्र या वस्तूंचा नंतर काहीही उपयोग होत नाही. शिवाय पुतळ्याजवळ वाहण्यात येणाऱ्या या वस्तूंची विल्हेवाट लावताना आयोजकांवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे संस्था, संघटनांनी प्रत्येकी केवळ एकच पुष्पहार, पुष्पचक्र, मेणबत्ती आणि उदबत्ती अर्पन करावी व उर्वरीत अनुयायांनी “एक वही व एक पेन” अर्पन करून अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी आयोजकांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ पेंडॉल उभारण्यात आला आहे. येथे अनुयायांना एक वही, एक पेन दान करता येणार आहे. हे गोळा झालेले साहित्य गरजू लोकांना दान करण्यात येणार आहे. यासह शैक्षणिक साहित्यासाठी रोख रक्कम देऊनही या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. या रोख रकमेतून दानकर्त्यातर्फे वही व पेन विकत घेतली जाईल, अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

याआधीही वणीत एक वही एक पेन हे अभियान राबवण्यात आले होते. त्यात गोळा झालेले साहित्य गरीब वस्ती व गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटचे (YIOAM) स्वयंसेवक परिश्रम घेत आहे. या अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964

Comments are closed.