निकेश जिलठे, वणी: शहरात चोरट्यांची मजल एवढी गेली आहे की चोरट्यांनी सीसीटीव्ही लावलेल्या आणि पोलीस स्टेशन समोरच असलेल्या तहसील कार्यालया समोरून दुचाकी लंपास केली. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय अशोक देशपांडे (24) हा शहरातील तेली फैल येथील रहिवासी आहे. तो तहसील कार्यालय येथे कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतो. सोमवारी दिनांक 27 जानेवारीला तो नेहमी प्रमाणे स. 10 वाजता त्याची बजाज पल्सर या दुचाकीने (MH 29AZ 1349) ड्युटीवर गेला होता. दुचाकी तहसील कार्यालयासमोर उभी करून तो रेकॉर्ड रूममध्ये गेला. सायंकाळी ऑफिस संपल्यावर जेव्हा तो घरी जाण्यास निघाला असता त्याला तहसील कार्यालयासमोर उभी केलेली मोटारसायकल आढळून आली नाही.
त्याने दुचाकीचा तहसील कार्यालय परिसर व आसपास शोध घेतला. मात्र त्याला मोटारसायकल कुठेही आढळून आली नाही. शेवटी मोटारसायकल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
हाकेच्या अंतरावरच पोलीस स्टेशन
तहसील कार्यालयाच्या बाजूलाच पोलीस स्टेशन आहे. विशेष म्हणजे या परिसरात सीसीटीव्ही लावलेले आहेत. मात्र आता चोरट्यांची मजल पोलीस स्टेशन जवळूनच चोरी करण्या पर्यंत गेली आहे. तहसील परिसर हा गजबजलेला परिसर आहे. या परिसरात विविध शासकीय कार्यालय आहेत. त्यामुळे या ठिकाणी बाहेरगावाहून अनेक लोक कामासाठी येतात. आता या वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवाय येथे येणाऱ्यांची चिंता वाढली आहे.
Comments are closed.