रेती चोरीचे अजब फंडे, शासनालाच घालत होते गंडे

अवैध रेती तस्करींच्या दोन भिन्न प्रकरणांत गुन्हे दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: चोर चोरच असतात. मात्र पोलीस अनेकदा चोरांवर मोर ठरतात. गुन्हे करण्यासाठी अपराधी अनेक फंडे वापरतात. मात्र एखाद्या छोट्याशा चुकीनंही ते पोलिसांच्या कचाट्यात येतात. शहरातील रेती तस्करीच्या दोन प्रकरणांत तस्करांनी शक्कल लढवली. मात्र महसुल प्रशासन आणि पोलिसांनी त्यांना अक्कल दाखवली. त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले. पहिला रेती तस्करीचा प्रकार विठ्ठलवाडीत झाला. तर दुसरा प्रकार नांदेपेरा रेल्वे क्रॉसिंगजवळ घडला. तस्करींचे हे दोन्ही डाव पोलिसांनी हाणून पाडलेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार दिनांक 30 एप्रिलला रेती तस्करी होणार असल्याचं पोलिसांना कळलं. लगेच हालचालींना वेग आला. एक जबरदस्त सापळा रचण्यात आला.  त्यानुसार बुधवारी पहाटे 3,15 वाजता विठ्ठलवाडीत रेतीची चोरटी वाहतूक पकडली. या प्रकरणात सावर्ला येथील विवेक वसंता अवधान (40) याच्यावर कारवाई झाली. त्याच्याकडून एक ब्रास रेती व ट्रॅकर असा 3 लाख 60 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

गाडी आलिशान, बेत छान; पण झाली घाण

महसुल रेती तस्करीच्या दुसऱ्या प्रकरणाचा भंडाफोड त्याच दिवशी रात्री 8.30च्या दरम्यान पोलिसांनी केला. सजवलेला व ताडपत्री झाकलेला एक शानदार ट्रक जात होता. त्यातून रेतीची तस्करी होत असल्याचा कुणी अंदाजही घेऊ शकले नाही. मात्र महसुल प्रशासन आणि पोलिस अलर्ट मोडवर आलेत. नायब तहसिलदार ब्राह्मणवाडे व अधिकारी सुनील उराडे यांनी नांदेपेरा रेल्वे क्रॉसिंगवर सापळा रचला. ट्रकचा तामझाम पाहता तो कोणाच्याही नजरेत तो तस्कर म्हणून आला नसता. मात्र महसुल प्रशासन आणि पोलिसांनी आपली चुणुक दाखवली. परवाना नसतानाही तो ट्रक रेतीची वाहतूक करत होता.

महसुल प्रशासनानं ट्रक (MH 29- BE 0800) आणि 4 ब्रास रेती ताब्यात घेतली. आलिशान गाडी होती. बेतही छान होता. मात्र प्रशासनानं त्यांचा डाव उधळला. रेती तस्करींचे प्रमाण दिवसेदिवस वाढत असल्यानं सध्या तो खमंग चर्चेचा विषय झाला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्याआदेशाने पीएसआय सुदाम आसोरे आणि कॉन्स्टेबल अनिल यांनी केली. आरोपीवर बीएनएस कलम 303(2) अन्वये गुन्हे दाखल झालेत. पुढील तपास स.फौ. सुरेंद्र टोंगे करीत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.