बहुगुणी डेस्क, वणी: नायगाव येथील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. विलास आनंदराव बोबडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ईसीजी, संपूर्ण रक्त तपासणी, शुगर तपासणी, बीपी यासह विविध तपासण्या करण्यात आल्या. सर्वाधिक व्यग्र कर्मचारी म्हणून पोलीस विभागाची ओळख आहे. सुट्टीची समस्या, दिवस रात्र काम यामुळे पोलिसांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ देखील मिळत नाही. त्यामुळे पोलीस स्टेशनलाच जाऊन कर्मचा-यांची तपासणी करण्याचा अभिनव उपक्रम डॉ. विलास बोबडे यांच्यातर्फे राबवण्यात आला.
कायदा सुव्यवस्थेचे रक्षण, गुह्यांचा तपास, आंदोलन, मोर्चा, सण इत्यादींची गस्त यामुळे पोलिसांना अधिक वेळ कर्तव्य बजवावे लागते. मनुष्यबळ कमी असल्याने कर्मचा-यांवर येणारा ताण, डबल शिफ्ट मध्ये काम, वेळी अवेळी जेवण याचा परिणाम कर्मचा-यांच्या आरोग्यावर होतो. तसेच वेळे अभावी कर्मचा-यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे थेट पोलीस ठाण्यात जाऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम राबवण्यात आला, अशी माहिती डॉ विलास बोबडे यांनी दिली.
कर्मचा-यांची तपासणी डॉ. सुरज चौधरी, डॉ. सचिन दुमोरे, डॉ. विवेक गोफणे, डॉ. मंगेश मस्की, डॉ. सचिन राजूरकर यांनी केली. यावेळी ठाणेदार माधव शिंदे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ठाणेदार माधव शिंदे म्हणाले की पोलीस कर्मचा-यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असा वरिष्ठांचा नेहमीच आदेश असतो. मात्र वेळे अभावी कर्मचा-यांचे आरोग्यांकडे दुर्लक्ष होते. डॉ. विलास बोबडे यांच्या उपक्रमामुळे कर्मचा-यांमध्ये आरोग्याबाबत जागरुकता आली आहे. यावेळी पोलीस कर्मचा-यांनी डॉ. बोबडे यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय डावरे, आशुतोष बोबडे इत्यादींनी परिश्रम घेतले. डॉ. बोबडे यांच्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.




Comments are closed.