महिलांच्या सुरक्षेच्या केवढा हा खड्डा, बसस्टॅण्ड बनला चोरांचा अड्डा

बसमध्ये चढणाऱ्या महिलेची सोनसाखळी दिवसाढवळ्या लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या लग्नाचा सिझन जोमात सुरू आहे. त्यामुळे बसस्टॅण्ड आणि परिसरात नागरिकांची गर्दीही वाढत आहे. या गर्दीचा फायदा भुरटे चोर घेत आहेत. बसमध्ये चढणाऱ्या किंवा उतरणाऱ्यांचे मौल्यवान दागिने चोरण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशीच घटना शुक्रवार दिनांक 9 मे रोजी दुपारी 4.30 ते 4.45 च्या दरम्यान घडली. नागपूर येथून शारदा कुडाळकर एका लग्नासाठी वणीत आल्यात. लग्न आटोपून त्या आपल्या बहिणीसोबत परत जाण्यासाठी वणी बस स्थानकावर आल्यात. त्यांनी दक्षता म्हणून आपली अंदाजे सव्वा लाख रूपये किमतीची सोन्याची चैन पर्समध्ये ठेवली. काही वेळानंतर ती सोन्याची चैन गर्दीत लंपास झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठलं. क्षणातच पोलिसांचा ताफा वणी बस स्थानकावर आला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. मात्र बस स्टँडवरील स्क्रीन छोटी असल्यामुळे त्यांनी ते पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नेऊन तपासलेत. मात्र त्यातून फारसं काही निष्पन्न झालं नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

लग्नसराई असल्यामुळे बस स्थानकावर दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. भुरटे चोर आपल्या सावजावर पाळत ठेवतात. या गर्दीत बेमालूमपणे शिरतात. ही कदाचित एकापेक्षा अधिकांची टोळी असल्याचा संशय लोक व्यक्त करीत आहेत. संधी मिळताच हे चोरटे आपल्या मालावर हात साफ करतात. वणी बसस्थानकावर पाकीट, मोबाईल किंवा अन्य वस्तुंच्या चोऱ्या नेहमीच होत राहतात. मात्र यातील बरेच जण पोलिसांपर्यंत जात नाहीत. त्यातही बसस्थानकावर पाहिजे तशी सुरक्षा व्यवस्था नाही. त्यामुळे अशा चोरींच्या घटना ही नित्याचीच बाब झाली आहे. बसस्थानक हे चोरट्यांचा अड्डा बनल्याचे दिसून येत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड पाहायला मिळत आहे. बसमध्ये चढतांना प्रवाशांची उसळणारी गर्दी चोरट्यांना हातचलाखी दाखविण्याकरिता फायद्याची ठरू लागली आहे. चोरटे गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर हात साफ करू लागले आहेत. शहर व परिसरात दिवसेंदिवस गुन्ह्यांचं प्रमाण वाढतच आहे. कुठे घरफोडी होत आहे. कुठे वाहनांची चोरी होत आहे. तर कुठे अशा घटना. त्यामुळे वणीकर जनतेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
 

Comments are closed.