चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, तिघांच्या आवळल्या मुसक्या

जेवणासाठी धाब्यावर थांबलेल्या ट्रॅव्हल्समधून केले होते 16 किलो चांदी लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: धाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या एका ट्रॅव्हल्समधून अज्ञात चोरट्यांनी बॅगमधले 16 किलो चांदी लंपास केले होते. 22 मे रोजी रात्री 11 वाजता मोहदा येथील धाब्यावर ही घटना घडली होती. सदर चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. या प्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने लावला असून यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे परिसरात हैदोस घालणा-या चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. एलसीबी पथकाने मध्यप्रदेश येथून तिघांच्या मुसक्या आवळल्या तसेच त्यांच्याकडून सुमारे 8 लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

काय होती घटना?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक प्रदीप कोटक रा. किसरा दमईगुडा रा. तेलंगणा हे येथील रहिवासी असून ते सराफा व्यावसायिक आहे. ते 22 मे रोजी यवतमाळ येथील एका सराफा व्यापा-याकडे चांदी खरेदीसाठी आले होते. त्यांनी यवतमाळहून सुमारे 16 किलो (किंमत 8 लाख रुपये) चांदी खरेदी केले. त्यानंतर रात्रीची ट्रॅव्हल्स पकडून ते गावी परत निघाले. रात्री 11 वाजताच्या सुमारास गाडी मोहदा येथील हिंदूस्थानी नामक एका धाब्यावर जेवणासाठी थांबली. प्रतिक हे सिटवर बॅग ठेवून वॉशरुमसाठी गेले. काही वेळात परत आल्यावर त्यांना तिथे ठेवलेली बॅग आढळली नाही. सुमारे एक तास ट्रॅव्हलची व प्रवाशांची चेकिंग करण्यात आली. मात्र बॅगचा काही पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी पांढरकवडा पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली.

चोरटे सीसीटीव्हीत कैद
सदर घटनेचा तपास एलसीबी पथकाकडे देण्यात आला. या पथकाने धाब्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना तीन अज्ञात ईसम बॅग घेऊन एका विना क्रमांकाच्या क्रेटा गाडीत बसताना दिसले. पथकाने खब-यांचे जाळे अलर्ट केले, तांत्रिक तपासाला गती दिली. अखेर हे चोरटे मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील मनवर तालुक्यातील एका गावातील असल्याची माहिती त्यांना मिळाली. पथक तात्काळ पटेलपुरा लुन्हेरा या गावी गेले. तिथून त्यांनी मौला खान रोशन खान (38) याला अटक केली. आधी तर त्याने तो मी नव्हेच ही भूमिका घेतली. मात्र नंतर मौला पोपटासारखा बोलायला लागला.

मौलाने त्याच्या सोबत असलेल्या आणखी दोन साथिदारांची माहिती दिली. ते दोघेही जवळच असलेल्या एका गावातील रहिवासी आहे. पथकाने खेरवा येथे जाऊन मुश्ताक उर्फ चिलू शमशेर खान, शाहरुख खान रमजान खान दोघेही (रा. खेरवा जि. धार मध्यप्रदेश) त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेला माल हस्तगत करण्यात आला. या तिन्ही चोरट्यांना एलसीबीने पुढील तपासासाठी पांढरकवडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक सतिश चवरे, सपोनि अजय कुमार वाढवे, पोउपनि धनराज हाके, पोलिस अंमलदार सुनिल खंडागडे, सुधिर पांडे, उल्हास कुरकुटे, सुधिर पिदूरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख, सतिश फुके, नरेश राऊत यांनी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.