दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दुचाकीस्वार ठार

जळक्याजवळील घटना, अपघातानंतर वाहनचालक पसार

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव-करंजी रोडवर एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. प्रदीप गुणवंत राउत असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आज शुक्रवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

प्रदीप गुणवंत राउत (वय अंदाजे 40) हे आवळगाव ता. मारेगाव येथील रहिवासी होते. खंडणी येथील रहिवासी असलेला त्यांचा साळा काही कामानिमित्त आवळगाव येथे त्यांच्या घरी आला होता. आज शुक्रवारी दिनांक 30 मे रोजी सकाळी ते त्यांच्या साळ्याला सोडण्यासाठी दुचाकीने खंडणी येथे गेले होते. त्यांनी साळ्याला सोडले व ते गावी परतत होते.

दरम्यान सकाळी 8 वाजताच्या सुमारास बोटोणी ते जळल्या दरम्यान त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. ते रस्त्यावर कोसळले. या धडकेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. अपघातानंतर अज्ञात वाहन तिथून निघून गेले. दरम्यान रस्त्यावरील ये-जा करणा-या प्रवाशांना प्रदीप रस्त्यावर कोसळलेले दिसले. त्यांनी याची माहिती मारेगाव पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ऍम्ब्युलन्सने त्यांना मारेगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रदीप यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुलं असा आप्त परिवार आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. पोलीस घटनेचा तपास करीत असून अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.