चक्क कॉलेजमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेच लंपास

आरोपी विरोधात गुन्हा दाखल...

बहुगुणी डेस्क, वणी: चक्क कॉलेजमध्ये लावलेले दोन सीसीटीव्ही कॅमेरेच एका लंपास केले. मारेगाव तालुक्यातील बुंराडा येथील एका कॉलेजमध्ये ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच याबाबत आरोपीविरोधात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मारेगाव तालुक्यात बुंराडा येथे महिला विधी महाविद्यालय आहे. शुक्रवारी दिनांक 30 मे रोजी  सकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान कॉलेजचे शिपाई गावातील एका किराणा दुकानाजवळ गेले होते. तिथे त्यांना हितेश (30) नामक एक व्यक्ती हातात असलेल्या दोन सीसीटीव्ही कॅमे-यासोबत खेळत होती. शिपायाला हे कॅमेरे कॉलेजमधले असल्याचा संशय आला. त्यामुळे त्याने हितेशला याबाबत विचारणा केली. मात्र त्याने सदर कॅमेरे हे कॉलेजमधून नाही तर दुसरीकडून आणले असे सांगितले.

शिपाई तातडीने मोटारसायकलने कॉलेजमध्ये गेला. त्याने कॉलेजला लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता त्याला कॉलेजच्या दुस-या माळ्यावरील दोन सीसीटीव्ही कॅमेरे गायब दिसले. त्याने याची माहिती कॉलेजच्या प्राचार्यांना दिली. प्राचार्यांनी याबाबत तक्रार करण्याचे सांगितले असता शिपायाने मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरोधा बीएनएसच्या कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.