बहुगुणी डेस्क, वणी: एमडी ड्रग्जचा पुरवठा करणा -या एका पेडलरच्या पोलीस पथकाने मुसक्या आवळल्या आहे. त्याच्याकडून साडे 11 हजारांचे एमडी ड्रग्ज सह मोटार सायकल व एक आयफोन जप्त केला आहे. वणीतील जत्रा मैैदानावर शुक्रवारच्या मध्यरात्री (शनिवारी) एलसीबीने ही कारवाई केली. याआधी शहरात गांजा विक्रीची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे समोर आले होते. मात्र या घटनेमुळे शहरात एमडी या ड्रग्जचे देखील मोठ्या प्रमाणात सेवन होत असल्याचे समोर आले आहे. तरुणाई व शाळा, कॉलेजचे विद्यार्थी देखील एमडीच्या आहारी गेल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबरीकडून जत्रा मैदानावर एमडी या ड्रग्जची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सदर पथक मध्यरात्री वाहनाने जत्रा मैदानावर गेले. आरोपी अलर्ट होऊ नये म्हणून पथकाने मैदानाच्या अलिकडेच वाहन लावले व ते पायी मैदानाच्या दिशेने निघाले. तिथे त्यांना एक तरुण एका दुचाकीवर (MH 34 BK 1843) बसून दिसला. त्याला नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव क्षितिज अशोक इंगळे (23) रा. रंगनाथ नगर असे सांगितले. त्याची झडती घेण्यासाठी पोलीस पुढे आले असता त्याने झडतीसाठी नकार दिला. मात्र नंतर पंचासमोर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात एका पन्नीमध्ये पांढ-या रंगाचा पावडर आढळून आला.
सदर पावडरबाबत विचारणा केली असता त्याने हा पावडर एमडी (mepthedrone) हा अमली पदार्थ असल्याचे सांगितले. त्याचे वजन केले असता ते सव्वा 2 ग्रॅम आढळून आले. अधिक चौकशी केली असता या ड्रगची 5 हजार रुपये ग्रॅमने विक्री केली जात असल्याची माहिती त्याने दिली. सदर ड्रग्ज हे 11 हजार 400 रुपयांचे आहे. पोलिसांनी त्यांच्याजवळून एक मोटारसायकल, एक आयफोन व ड्रग्ज असा 86 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शहरातील ओसाड ठिकाणं बनले गंजेड्यांचा अड्डा
शहरातील अनेक ओसाड ठिकाणी मादक द्रव्यांचे सेवन होते. यात शाळकरी मुलांपासून ते कॉलेजच्या तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. व्यसनाधीन झालेले या मुलांना व तरुणांना अनेक वर्षांपासून गावातूनच हे ड्रग्ज मिळते. हे सर्व चांगल्या घरातील मुलं असून या व्यसनामुळे त्यांची तरुणाई व्यर्थ जात आहे. गावाबाहेरील अनेक ओसाड लेआऊट, नदी रोडवरील मैदान, ओसाड बगिचा व मैदान नशा करण्याचे ठिकाण झाले आहे. पोलीस पथक वेळोवेळी धाड टाकून गंजेड्यांना अटक करतात. मात्र ड्रग्ज सप्लायर काही केल्या हाती येत नव्हता. त्यामुळे हे प्रकार शहरात सुरूच आहे. पोलिसांनी नशेचा हा धंदा समूळ नष्ट कराव, अशी अपेक्षा वणीकर व्यक्त करीत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी क्षितिज याच्यावर ड्रग्ज प्रतिबंधक कायद्याच्या ((NDPS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई धनराज हाके, उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागडे, नीलेश निमकर, सुधीर पिदूरकर, रजनिकांत मडावी, सलमान शेख यांनी केली. घटनेचा तपास धनंजय रत्नपारखी करीत आहे.



Comments are closed.