वेकोलि इंजिनियरला 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

ट्युशनला जाणा-या एका अल्पवयीन मुलीचा केला होता विनयभंग

बहुगुणी डेस्क, वणी: एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी वेकोलि इंजिनियरला दोन वर्षांचा सश्रम कारावास व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पांढरकवडा सत्र न्यायालयाने सबळ पुरावे व पीडितेच्या बयानावरून ही शिक्षा सुनावली आहे. अजित कुमार मिश्रा (44) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या इंजिनियरचे नाव असून त्याने 2019 मध्ये एका 14 वर्षीय मुलीचा विनयभंग केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी अजित कुमार मिश्रा हा मुळचा परेना ता. जि. शिवांग रा. बिहार येथील मुळचा रहिवासी आहे. तो वेकोलित इंजिनियर म्हणून काम करत होता व तो भालर टाउनशिप येथे राहत होता. 30 सप्टेंबर 2019 रोजी पीडित मुलगी (14) ही तिच्या एका मैत्रिणीसोबत ट्यूशनला जात होती. दरम्यान अजित कुमार याने पीडित मुलीला थांबवले व तिच्यासोबत अश्लिल संवाद साधला. मुलीने ही घटना तिच्या पालकांना सांगितली. तिच्या पालकांनी शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली होती.

या प्रकरणी पोलिसांनी अजित कुमार मिश्रा विरोधात आयपीसीच्या कलम 354 अ, 354 ड, 341 व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरण पांढरकवडा येथील सेशन कोर्टात सुरु होते. तपास अधिकारी एपीआय सतिश चावरे व एलसीबी पथकाने या केसचा तपास केला. अखेर सबळ पुरावे, पीडितेची साक्ष यावरून आरोपी अजितकुमार विरोधात गुन्हा सिद्ध झाला. न्यायालयाने आरोपीला पोक्सोच्या अंतर्गत 2 वर्ष सश्रम कारावास व 1 लाखांचा दंड तसेच इतर कलमानुसार एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

सदर प्रकरणी सरकारी अभियोक्ता ऍड प्रशांत मानकर यांनी पीडितेची बाजू मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून आशिष टेकाडे यांनी काम पाहिले.  

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.