टेस्ट ड्राईव्ह करताना मेकॅनिकचा कारमधल्या 7 लाखांच्या दागिन्यावर डल्ला

वणीतील मुकुटबन रोडवरील एका गॅरेजमधली घटना, अवघ्या काही तासात प्रकरणाचा छडा

विवेक तोटेवार, वणी: कार रिपेअरिंग केल्यानंतर कारची टेस्ट ड्राइव्ह करताना गॅरेजमधल्या मॅकेनिकने कारमध्ये ठेवलेल्या दागिन्यांवर हात साफ केला. सुमारे 7 लाखांचे दागिने मेकॅनिकने कारच्या ड्रॉव्हरमधून लंपास केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला लगेच ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरी गेलेले साडे सात तोळे सोने हस्तगत केले. बुधवारी दिनांक 28 मे रोजी दुपारी मुकुटबन रोडवरील एका गॅरेजमध्ये ही घटना घडली होती. तक्रार दाखल झाल्याच्या अवघ्या काही तासात पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला. 

तक्रारीनुसार, रवींद्र रामदास राजुरकर (45) हे मोहदा येथील रहिवासी आहे. ते शेती करतात. त्यांच्याकडे टाटा नेक्सॉन ही कार आहे. त्यांची पत्नी ही लग्न कार्यासाठी भद्रावती येथे गेली होती. दिनांक 28 मे रोजी रवींद्र हे लग्नासाठी भद्रावती निघाले. जाताना त्यांनी पत्नीचे दागिने एका छोट्या पर्समध्ये ठेवले व सदर पर्स त्यांनी कारच्या एका ड्रॉव्हरमध्ये ठेवली. दरम्यान त्यांना कारचे कुलन्ट संपल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कार मुकुटबन रोडवरील नायरा पेट्रोल पम्प जवळील मिर्जा कार सर्विसिंग या गॅरेजमध्ये नेली.

गॅरेज मालकाने कार ताब्यात घेऊन मेकॅनिकच्या हाती दिली. मेकॅनिकने कार रॅम्पवर चढवली. मेकॅनिकने 15 मिनिटांनी कुलंट टाकून कार रवींद्र यांच्या ताब्यात दिली. त्यानंतर ते थेट भद्रावतीला निघून गेले. भद्रावतीला पोहोचल्यावर त्यांनी ड्रॉव्हर बघितले असता त्यांना दागिने आढळले नाही. त्यामुळे ते पत्नीला घेऊन थेट वणी येथे आले. ते कार सर्विसिंग करणा-या दुकानात गेले. त्यांनी मेकॅनिकला विचारणा केली. मात्र त्याने याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घरून कारने निघाल्यावर रवींद्र मध्ये फक्त कार सर्विसिंग सेंटरमध्ये थांबले होते. त्यानंतर कुलंट टाकल्यावर ते थेट भद्रावती येथे थांबले होते. त्यामुळे त्यांचा संपूर्ण संशय मेकॅनिकवर होता. त्यांनी वणी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिसांच्या डीबी पथकाने लगेच मेकॅनिक शेख तनवीर शेख अजाज (20) रा. रंगनाथ नगर वणी याला ताब्यात घेतले. आधी त्याने तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. मात्र पोलिसी ख्याक्या मिळताच त्याने गुन्हा कबूल केला. कारची टेस्ट ड्राईव्ह करताना त्याने दागिने काढल्याची माहिती दिली. त्याच्याकडून प्रत्येकी तीन तोळ्याच्या दोन बांगड्या, दीड तोळ्याचा चपला कंठी हार असा सुमारे साडे सात तोळ्याचा मुद्देमाल हस्तगत केला.

या प्रकरणी आरोपीवर बीएनएसच्या कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या काही तासात प्रकरणाचा छडा लावला. सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वणी याचे आदेशानुसार पोउपनि धीरज गुल्हाने, पोलीस कॉन्स्टेबल गणेश, नंदकुमार, मोनेश्वर, गजानन यांनी केली. अवघ्या काही तासात प्रकरणाचा छडा लावल्याने समाधान व्यक्त होत आहे.

उडता वणी… ! ड्रग्ज पेडलर तरुणाच्या आवळल्या मुसक्या

Comments are closed.