मुकुटबनच्या उपसरपंचाविरोधात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल

सरपंचांना जातीवाचक शिविगाळ व अपमानीत केल्याचा आरोप

बहुगुणी डेस्क, वणी: मुकुटबन ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना  आरमुरवार यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी उपसरपंच अनिल राजेश्वर कुंटावार यांच्याविरुद्ध मुकुटबन पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी सकाळी मुकुटबन ग्रामपंचायतीची मासिक सभा होती. मात्र, ही सभा कोरमअभावी तहकूब केली. त्यानंतर सरपंच मीना आरमुखार त्यांच्या केबिनमध्ये बसून होत्या. तेथे गावातील रुख्सार खयाम सय्यद नामक महिला एका शिफारस पत्रावर सरपंचाची सही घेण्यासाठी आली. यावर सरपंच मीना आरमुरवार यांनी शिफारसपत्रावर माझ्या सहीची गरज नाही, असे सांगितले. त्यामुळे या महिलेने सरपंचांसोबत वाद घातला.

त्यानंतर ही महिला उपसरपंच अनिल कुंटावर यांच्याकडे गेली. त्यामुळे उपसरपंचाचा पारा भडकला आणि ते थेट ग्रामपंचायत कार्यालयात आले. सरपंच त्यांच्या कक्षात बसून असतानाच उपसरपंचांनी सरपंचांना जातिवाचक शिवीगाळ करून अपमानित केले. तसेच अंगावर येऊन जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप सरपंच मीना आरमुरवार यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे. त्यावरून उपसरपंचाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Comments are closed.