घुग्गूस रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीला अपघात

मध्यप्रदेशातील युवकाच्या पायाला झाली गंभीर इजा,

विवेक तोटेवार, वणी: घुग्गूस मार्ग दिवसेंदिवस अपघातांचा हॉटस्पॉट होत चालला. कधी कोणतं मोठं वाहन मागून धडकेल सांगता येत नाही. त्यातच गुरुवार दिनांक 26 जून रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान असाच प्रकार घडला. घुग्गूस रोडवरील वाघदरा या गावाजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकी चालकाच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. जखमीला सुरवातीला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

गुरुवारी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान दोन इसम आपल्या दुचाकी क्रमांक MP 13 ZA 8298 ने वणीवरून वाघदरा येथे जात होते. हे दोघेही मध्यप्रदेश येथील रहिवासी असून चटई, झाडू विकण्याचा व्यवसाय करतात. ते सध्या वागदरा येथे झोपडी करून राहतात. दोघेही रस्त्याने येत असताना मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या धडकेत दुचाकीचालक बादल पवार (23)याच्या पायावरून वाहन गेल्याने त्यांच्या पायाच्या पंजाला गंभीर इजा झाली. त्याला तातडीने वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु परिस्थिती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती आहे. वृत्त लिहेपर्यंत वणी पोलिसात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.