पकडलेली दारू पोलिसांनी परस्पर सोडली
झरी(सुशील ओझा): तालुक्यातील वठोली गावातुन तेलंगांणातील सांगळी गावात ऑटोने जाणारी देशी दारू तर पकडली मात्र ही दारू परस्पर सोडल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचं म्हणजे ही कार्यवाही होत असताना गावातील अनेकांनी पाहिले. त्यामुळे पाटण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
झरी तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत जनावर तस्करी, मटका, अवैद्य दारू विक्री बाबत संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. आता यातच दारू सोडल्याचे प्रकरण समोर येत आहे. प्राप्त माहिती नुसार १९ मार्च रोजी पाटण पोलिसांच्या खबरीने रात्री पाटणबोरी येथील अण्णा नामक एक इसम देशी दारू दुकानातून ३० पेटी देशी दारूच्या पेट्या ऑटोने तेलांगण्यातील सांगळी येथे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसाना दिली. यावरून पाटण येथील एक अधिकारी व दोन कर्मचारी रात्री तीन वाजता दरम्यान पाटणबोरी मार्गावर वठोली गावाजवळील म्याकलवर यांच्या शेताजवळ व माजी सरपंच यांच्या घरासमोर देशी दारूने भरलेला ऑटो पकडला. त्यावेळेस ऑटोमध्ये ३० पेट्या दारू व ४ इसम होते. त्या ऑटोसोबतच मदत व माहिती देण्याकरीता दोन दुचाकी होत्या. दुचाकी वरील २ इसम व ऑटोमधील ४ इसम असे एकुन ८ लोक यावेळी होते.
मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न करता त्यांना सोडून दिल्याची माहिती समोर येत आहे. केस न करण्यासाठी व प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांनी मोठी रक्कम उकळल्याचीही खमंग चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. हा सर्व प्रकार वठोली गावातील अनेक नागरिकांनी पहिला. पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान दारू भरलेला ऑटो पोलिसांनी पकडला. तोच देशी दारूने भरलेला ऑटो ५ वाजता वाठोली गावातून तेलांगणातील सांगळी गावाकडे गेला असल्याचे बघणारे नागरिक सांगतात.
याबाबत पाटणचे ठाणेदार शिवाजी लष्करे यांना विचारणा केली असता अशी कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे त्यांनी सांगितले व आमच्या हद्दीत पाटनबोरी इथून दारू येत नसून सतपल्ली येथून दारू येत असल्यावर दुजोरा दिला. यावरून पाटण हद्दीत दारू तस्करी होते हे निश्चित. तर पाटण येथीलच पीएसआय प्रफुल्ल डाऊले यांनाही ३० पेटी दारू बाबत विचारणा केली असता त्यांनीही मी ठाण्यातच होतो असे सांगितले.
मग रात्री ३ वाजता पोलीस गाडी घेऊन जाणारे अधिकारी व २ कर्मचारी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर प्रकरणाबाबत उपविभागीय अधिकारी विजय लगारे याना मोबाईलद्वारे माहिती देऊन विचारणा केली असता मी संपूर्ण माहिती घेऊन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वरिष्ठ अधिका-यांसोबत सदर प्रतिनिधींची चर्चा झाल्याची कुणकुण पाटण पोलीसांना लागताच ठाण्यातील एक अधिकारी आपली खाजगी कार घेऊन वठोली गावात पोहचला. ज्याने या दारूची माहिती दिली त्या मुखबिरला बोलावून तुझे पैसे सायंकाळ पर्यंत देतो असे सांगून निघून गेले. रात्री १२ वाजताच्या दरम्यान त्या अधिका-याला वाठोली गावात जाऊन भेटण्याची गरज काय ? ज्यामुळे कुठे तरी पाणी मुरत असल्याचे दिसते. तसेच घटनेच्या दिवशी ठाण्यात हजर असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल लोकेशन घेतल्यास सत्य बाहेर येईल.
३० पेटी दारू ज्याची किंमत ७५ हजार रुपये, ऑटो १ लाख ५० हजार, २ दुचाकी ६० हजार असा अंदाजे ३ लाखाचा मुद्देमाल व ८ आरोपी एवढी मोठी कार्यवाही न करता फक्त पैशासाठी सोडून दिले ज्यामुळे अशा भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही केली जाईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तेलांगणातील सांगळी गावात दारू विक्री जाणाऱ्याकडून ७२ हजार रुपये महिना व दारू पुरवठा करणाऱ्याकडून ३० हजार रुपये हप्ता जात असल्याची माहिती आहे. आता या प्रकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कार्यवाही होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.