टिळकांच्या वेशभूषेने शतकापूर्वीच्या स्मृतींना उजाळा !

जयंत त्रिवेदींनी वेधले वणीकरांचे लक्ष, अधिका-यांना निवेदन

श्रीवल्लभ के.सरमोकदम, वणी: स्थानिक नगर वाचनालयात नियमितपणे होणार्‍या “माझा गाव माझा वक्ता”या व्याख्यानमालेचे ४७ वे पुष्प आयोजकांसह वणीकरांसाठीही खास ठरले आहे.नुकत्याच झालेल्या लोकमान्य टिळकांच्या जयंती दिनी हे पुष्प पार पडले.विशेष म्हणजे लो.टिळक महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी जयंत त्रिवेदी यांनी टिळकांची हुबेहूब वेशभूषा करुन हे पुष्प गुंफले.अशा प्रकारे व्याख्यान देणारे बहुदा ते पहिलेच व्याख्याते असल्याने आयोजक संस्था असलेल्या नगर वाचनालय व विदर्भ साहित्य संघासह वणीकरांसाठीही हे व्याख्यान खास ठरले आहे.यावेळी अध्यक्षस्थानी प्रा.दिलीप अलोणे यांच्यासह अशोक सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते.

अशा प्रकारच्या वेशभूषेचे कारण स्पष्ट करताना त्रिवेदी यांनी व्याख्यानातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.ही वेशभूषा म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात टिळकांच्या स्थानिक पुतळ्याच्या अवहेलनेविरोधातला सत्याग्रह होता. लोकमान्यांनी आत्मनिर्भर राष्ट्राचा मंत्र स्वातंत्र्यापूर्वीच दिल्याचे सांगत पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी,प्रतिष्ठेचे फर्ग्युसन काॅलेज त्याचाच भाग असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी टिळकांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकून वणीतील पुतळ्याच्या रुपाने टिळकांचा या नगरीशी असलेला ॠणानुबंध उधृत केला.विशेष म्हणजे व्याख्यानाची सुरुवातच ” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे…”या सिंहगर्जनेने करताना त्रिवेदी यांच्या अंगी खुद्द लोकमान्यांनी संचार केल्याचे जाणवत होते.आवाजाची लकबही त्याच धाटणीची होती.

विशेष म्हणजे, नक्कल या लोककलेचा जन्म शतकभरापूर्वी स्वातंत्र्यलढ्यादरम्यान लो.टिळकांच्या नकलेने झाला.मुंबईतील एका सभेला ऐन वेळी लो.टिळक उपस्थित होवू न शकल्याने आद्य नकलाकार गोपाळराव भोंडे यांनी लोकमान्यांच्या वेषभूषेत सभेला संबोधीत केल्याचे अध्यक्षिय भाषणातून प्रा.दिलीप अलोणे यांनी सांगितले.त्याची आज वणीत पुनरावृत्ती झाल्याचेही ते यावेळी म्हणाले.अशोक सोनटक्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना चांगला वक्ता होण्यासाठी चांगला श्रोता होण्याचे आवाहन उपस्थितांना केले.व्याख्यानाच्या सुरुवातीला गंधेवार गुरुजींनी गित सादर केले तर सुत्रसंचालन प्रा. अभिजीत अणे यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

माझ्या पुतळ्याची अवहेलना थांबवा हो… !
जयंत त्रिवेदी यांनी व्याख्यानाच्या दुसर्‍या दिवशी पुन्हा त्याच पेहरावात लो.टिळकांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन आपला मोर्चा उपविभागिय कार्यालयाकडे वळविला. टिळकांच्या पेहरावात ते पुतळ्यापासून कार्यालयापर्यंत चक्क चालत गेले. यावेळी त्यांनी पुतळ्याच्या जुन्या मूळ जागेवर जावून अगदी टिळकांची छबी दिसावी त्याच एटीत उभे राहून संपूर्ण चौकाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तहसिलदार धुळधर यांना निवेदन देत टिळकांचा पुतळा पूर्ववत जुन्याच जागेवर बसविण्याची मागणी केली. यावेळी “साहेब माझ्या पुतळ्याची अवहेलना थांबवा हो…”अशा आर्त स्वरात त्यांनी तहसिलदारांशी संवाद साधला. यावेळी गोपाल त्रिवेदी, जयंत देवडे, राजु वाघमारे, मुकेश बत्रा हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Comments are closed.