बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील दीपक चौपाटी मच्छी मार्केट येथून एक मोटरसायकल चोरीचा प्रकार घडला आहे. दुकानदार ग्राहक करताना व्यस्त असताना चोरट्याने डाव साधला आहे. याप्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणी परिसरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
तक्रारीनुसार, मारोती अर्जुन भानारकर (वय 62) हे भोईपुरा, स्टेट बँक मागे, वणी येथील रहिवासी आहे. रविवारी दि. 20 जुलै 2025 रोजी रात्री 8:45 वाजता ते मासळी विक्रीसाठी दीपक चौपाटी मासळी मार्केट येथे गेले होते. त्यांनी आपली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (क्रमांक MH 29CC1367) रस्त्याच्या कडेला चावी लावून उभी केली. ते पिशवीतून मासळी काढण्यात व्यस्त होते.
रविवारी मार्केटचा दिवस असल्याने ग्राहकांची गर्दी होती. दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांची मोटरसायकल सुरू करून टिळक चौकाकडे पळ काढला. दुचाकी चोरीला जाताच भानारकर यांनी तातडीने शोध घेतला, परंतु मोटरसायकल आढळली नाही. चोरीस गेलेल्या मोटरसायकलची किंमत अंदाजे 70,000 रुपये आहे. भानारकर यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी बीएनएसच्या कलम 303 (2) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.


Comments are closed.