तहसिल कार्यालयात धिंगाणा, काच फोडून कर्मचा-यांना शिविगाळ

कर्मचा-यांना धमकी, विविध कलमान्वये गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: तहसील कार्यालयात एका व्यक्तीने धिंगाणा घातला. कर्मचा-यांना शिविगाळ करीत त्याने एका महिला कर्मचा-याच्या टेबलवरचा काच फोडला. शुक्रवारी, दि. 25 जुलै रोजी दुपारी 4:40 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी महेश विठ्ठल वैद्य याच्या विरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या आधी आरोपीने महिला कर्मचा-याच्या घरी जाऊनही धिंगाणा घातला. या प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तक्रारीनुसार, फिर्यादी मधुरा मोरेश्वर राजूरकर (वय 24 रा. पटवारी कॉलोनी लालगुडा) या अन्न पुरवठा विभागात कार्यरत आहे. शुक्रवारी साडे 4 वाजताच्या दरम्यान आरोपी महेश विठ्ठल वैद्य (रा. जुना वागदरा) हा कार्यालयीन कामासाठी कार्यालयात आला. त्याने कार्यालयीन काम न झाल्याच्या रागातून कार्यालयातील कर्मचा-यांना शिविगाळ केली. तसेच मधुरा यांच्या टेबलावरील काच फोडून एक दिवशी कार्यालयातील कॉम्प्युटर फोडून टाकेन अशी धमकी दिली. या घटनेमुळे महिला कर्मचारी घाबरल्या.

त्यांनी ही घटना तहसीलदार धूळधर यांना कळविली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 च्या कलम 221, 296, 324(4), 351(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास सुरू आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यालयाआधी घरी घुसून धिंगाणा
या घटनेआधी आरोपी महेश वैद्य हा महिला कर्मचा-याच्या घरी गेला. तिथे त्याने तिच्या वृद्ध आजीला शिविगाळ केली. तसेच तिच्या आजीचा मोबाईल रागाच्या भरात हिसकावून तोंडावर फेकला. यात तिच्या तोंडाला दुखापत झाली. तसेच, घराबाहेर पडताना त्याने घरासमोर उभे असलेल्या चारचाकी वाहनाची मागील काच फोडली. या प्रकरणी देखील महेश वैद्य याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.