बहुगुणी डेस्क, वणी: शेतात वीज कोसळून एक तरुण शेतकरी ठार झाला तर दोघे जखमी झालेत. आज बुधवारी दुपारी तेजापूर शेतशिवारात ही दुर्दैवी घटना घडली. धम्मरत्न सुधाकर भगर (वय अंदाजे 24) असे मृत शेतक-याचे नाव आहे. तर गजानन दिवाकर कोंडेकर (24) व पूनम संजय मालेकर (23) असे जखमींचे नावं आहेत. तर त्यांच्यासोबत असलेली चौथी व्यक्ती दुचाकी ठेवण्यासाठी रोडवर गेल्याने ती थोडक्यात बचावली.
प्राप्त माहितीनुसार, धम्मरत्न भगत हा तेजापूर येथील रहिवासी होता. त्याचे जवळच असलेल्या अडेगाव शिवारात शेती होती. आज बुधवारी दिनांक 06 ऑगस्ट रोजी सकाळी तो शेतीच्या कामासाठी शेतात गेला होता. दरम्यान दुपारी 12 वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. त्यामुळे धम्मरत्न व जवळच्या शेतात असलेले गजानन दिवाकर कोंडेकर व पूनम संजय मालेकर हे शेताजवळ असलेल्या एका झोपडीत आस-यासाठी थांबले.
दरम्यान झोपडीवर वीज कोसळली. यात धम्मरत्न जागीच ठार झाला तर त्यांच्यासोबत असलेले दोघे जखमी झालेत. त्यांच्या सोबत असलेल्या एकाने ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना व परिचितांना दिली. धम्मरत्नला वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. तर दोन जखमींवर वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे.
चौथा तरुण थोडक्यात बचावला
विजांच्या कडकडाटासह पाऊस लागताच तिघांनीही जवळच असलेल्या एका झोपडीचा आसरा घेतला. याच वेळी त्यांच्यासोबत अक्षय कोंडेकर नामक तरुण होता. तो शेतात दुचाकी घेऊन आला होता. मात्र पावसानंतर शेतात झालेल्या चिखलातून दुचाकी निघणार नाही म्हणून तो दुचाकी ठेवण्यासाठी रस्त्यावर गेला होता. त्याच वेळी झोपडीवर वीज कोसळली. दुचाकी ठेवण्यासाठी गेल्याने त्यांचा सहकारी थोडक्यात बचावला.
धम्मरत्न हा त्याच्या आई वडिलांसह राहत होता. त्याच्या वडीलांच्या प्रकृती अस्वस्थामुळे घराचा संपूर्ण भार धम्मरत्नच्या खांद्यावर होता. तो शेती सांभाळून उदरनिर्वाह करायचा. धम्मदीपच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



Comments are closed.