बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा (लहान) शेतशिवारात वीज एका शेतक-यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनिल रमेश फरताडे (35) असे मृत शेतक-याचे नाव आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली. बुधवारी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातच विजेचे तांडव पाहायला मिळाले. तेजापूर येथे देखील एका तरुण शेतक-याचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झालेत.
प्राप्त माहितीनुसार अनिल हे पिसगाव येथील रहिवासी होते. पांढरकवडा (लहान) शिवारात ते ठेक्याने शेती करीत होते. बुधवारी दिनांक 6 ऑगस्ट रोजी ते शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. दुपारी 2 वाजताच्या सुमारास ते डवरणी करीत होते. दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. त्यामुळे त्यांनी शेतात असलेल्या एका मोहाच्या झाडाचा आसरा घेतला.
त्याच वेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेजारच्या शेतातील लोकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. अनिल यांचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. तसेच त्यांना एक छोटे बाळ आहे. घरातील ते एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.


Comments are closed.