भरधाव वाहनाची तरुणाला धडक; जागीच मृत्यू

मिलन धाब्याजवळ बुधवारी रात्री भीषण अपघात

बहुगुणी डेस्क, वणी: वणी-मारेगाव मार्गावरील लालपुलिया परिसरातील मिलन धाब्या जवळ भीषण अपघात झाला. एका भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या युवकाला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. बोद्धा उर्फ अख्तर मोबीन शेख (वय 30) असे मृताचे नाव असून तो राजूर (कॉ.) येथील रहिवासी होता. बुधवारी, 6 ऑगस्ट रोजी रात्री 7.30 ते 8 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अख्तर हा वाहनचालक होता. तो विविध वाहने चालवत असे. रात्री पायी रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. धडकेनंतर वाहन चालक वाहन घेऊन फरार झाला. दरम्यान रस्त्यावरील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीतील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

Comments are closed.