वणी-कोरपना बससेवा बंद… ऑटोवाल्यांचे मनमानी दर…
प्रवासी भाडे वाढले... विद्यार्थी, मजूर व प्रवाशांना मोठा फटका
बहुगुणी डेस्क, वणी: वणी ते कोरपना या महत्त्वाच्या मार्गावर शिरपूर ते वेळाबाई फाटा दरम्यान रस्त्याची दुरावस्था असल्याने या मार्गावरील सर्व बस फेऱ्या बंद करण्यात आल्या. यासह प्रवासी ट्रॅव्हल्सने देखील आपली सेवा बंद केली आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणा-यांसमोर मोठे संकट उभे झाले आहे. बस सेवा बंद झाल्याने ऑटो हा एकमेव पर्याय उरला असून, ऑटोवाल्यांनी संधीचा फायदा घेत मनमानी दर आकारणी सुरू केली आहे. मूळचा 72 रुपये असलेला प्रवास आता 100 रुपये झाला आहे. तर लाडक्या बहिणींना अर्ध्या तिकीट ऐवजी तिप्पट खर्च करावा लागत आहे. शिवाय, हाउसफुल्ल ऑटोतून प्रवास करताना प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरपना-नागपूर ही ट्रॅव्हल्स बंद झाल्याने या मार्गाहून नागपूरला जाणा-या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहे.
वणी-कोरपना या रस्त्याच्या डांबरीकरण आणि दुरुस्तीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. मात्र, लोकप्रतिनिधींची आग्रही भूमिका आणि बांधकाम विभागाचे ढिसाळ नियोजन यामुळे रस्त्याची स्थिती सुधारली नाही. याचा थेट फटका रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार, महिला, विद्यार्थ्यां ते सर्वसामान्य प्रवासी अशा सर्वांनाच बसत आहे. तर शिरपूर ते वेळाबाई फाटा दरम्यान झालेल्या रस्त्याच्या दुर्दशेमुळे वणी-कोरपना वाहतूकदारांनी आपला मार्ग बदलविला आहे. वाहतूकदार सध्या खातेरा, वेळाबाई , धानोरा आदी पर्यायी अधिकचे अंतर कापून प्रवास करतोय.
विद्यार्थी व मजुरांना मोठा फटका
हा मार्ग वणी, शिरपूर, कोरपना, वेळाबाई, शिंदोला आणि कुरई येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, मजूर, कर्मचारी आणि इतर प्रवाशांसाठी महत्त्वाचा आहे. बससेवा बंद असल्याने अनेक विद्यार्थी व मजूर हे आता ऑटोने प्रवास करीत असल्याने त्यांना अधिकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कर्मचारी आता स्वत:च्या वाहनाने प्रवास करीत आहे. मात्र रस्त्यावरील खड्डे जीवघेणे ठरत असल्याने हा एकमेव पर्याय देखील धोकादायक ठरत आहे.
तीस वर्षापासून सारेच आमदार-खासदार नापास
अनेक पक्षांच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी निवडणूक संकल्पपत्रात वणी-कोरपना मार्गाच्या चौपदरीकरणाचे आश्वासन दिले होते. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निवडणूक संकल्पपत्रात हा मुद्दा अग्रक्रमाने होता. तर रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाचा छच तयार झाला. मात्र ही समस्या सोडवण्यात सर्वच आमदार खासदार नापास झाले आहेत. विशेष म्हणजे एकाही लोकप्रतिनिधींना साधा चांगल्या दर्जाचा रस्ताही बनवता आला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
रोज शेकडो प्रवासी, विद्यार्थी, मजूर, कर्मचारी वणी-कोरपना या मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे सध्या प्रवाशांना धोकादायक मार्गावरून अधिकचे पैसे खर्च करून प्रवास करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची स्थानिक नागरिकांची मागणी असून ते रस्त्या दुरुस्तीच्या अपेक्षेत आहे.



Comments are closed.